पाकिस्तानचा भेदक मारा! आफ्रिकेला 219 धावांवर रोखले
By admin | Published: June 7, 2017 09:51 PM2017-06-07T21:51:42+5:302017-06-07T21:51:42+5:30
भारताकडून मानहानिकारक पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र आपल्या खेळात सुधारणा घडवून
Next
>ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 7 - भारताकडून मानहानिकारक पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र आपल्या खेळात सुधारणा घडवून आणली आहे. आज आयसीसी चॅंम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुरू असलेल्या लढतीत पाकिस्तानी गोलंदाजांनी अत्यंत भेदक मारा करत वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 219 धावांत रोखले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करताना चांगली फलंदाजी करता आली नाही. क्विंटन डी कॉक (33) आणि हाशिम अमला यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा डाव अडखळला. इमाद वासिम आणि हसन अली यांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेची धावगती आटली. त्यातच एबी डीव्हिलियर्स (0), जेपी दुमिनी (8) आणि वेन पार्नेल (0) यांनी निराशा केल्याने आफ्रिकर संघ अडचणीत आला.
मात्र संघाची अवस्था 6 बाद 118 अशी केविलवाणी झाली असनाता डेव्हिड मिलरने एक बाजू लावून धरली. त्याने ख्रिस मॉरिससोबत (28) 47 आणि कागिसो रबाडासोबत (26) 48 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 50 षटकात 8 बाद 219 धावांपर्यंत मजल मारून दिली. आपल्या नैसर्गिक आक्रमक खेळाला मुरड घालून चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करणारा मिलर 75 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून हसन अलीने तीन तर जुनैद खान आणि इमाद वासिमने प्रत्येकी दोन गडी बाद केले.