व्हिसा देण्यास उशीर केल्याची पाकची तक्रार
By admin | Published: April 27, 2017 12:49 AM2017-04-27T00:49:46+5:302017-04-27T00:49:46+5:30
आशियाई स्क्वॉश चॅम्पियन्स स्पर्धेतून बाहेर पडल्याबद्दल भारताला दोष देत पाकिस्तानने जागतिक व आशियाई स्क्वॉश संघटनेकडे भारताची तक्रार केली आहे.
कराची : आशियाई स्क्वॉश चॅम्पियन्स स्पर्धेतून बाहेर पडल्याबद्दल भारताला दोष देत पाकिस्तानने जागतिक व आशियाई स्क्वॉश संघटनेकडे भारताची तक्रार केली आहे. भारताने जाणीवपूर्वक त्यांच्या खेळाडूंना व्हिसा देण्यास विलंब केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानने हा मुद्दा जागतिक तसेच आशियाई संघटनेकडे उपस्थित केला आहे. चेन्नईमध्ये बुधवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील पाकिस्तान विद्यमान चॅम्पियन आहे. पीएसएफने दावा केला आहे की, खेळाडू व अधिकाऱ्यांनी वेळेपूर्वी म्हणजे १७ मार्चलाच व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र, भारताने व्हिसा देण्यास विलंब केला.
‘पीएसएफ’चे सचिव ताहीर सुलतान म्हणाले, ‘आम्ही नेहमीच खेळ आणि राजकारण हे वेगवेगळे असले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, भारताने खेळामध्ये राजकारण आणले आहे.’ (वृत्तसंस्था)