पाकचं दिवाळं, भारत आशियाचा डॉन
By admin | Published: October 30, 2016 06:54 PM2016-10-30T18:54:08+5:302016-10-30T20:53:19+5:30
भारताने चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेवर आपलं नाव कोरलं आहे. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-2 ने फडशा पाडला.
Next
ऑनलाइन लोकमत
कुआंटन, दि. 30 - भारताने चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेवर आपलं नाव कोरलं आहे. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-2 ने फडशा पाडला आणि देशवासियांना दिवाळीची भेट दिली.या स्पर्धेत पाच वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानला नमवत पहिल्यांदाच आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक जिंकला होता. आता पाच वर्षानंतर भारताने पुन्हा एकदा अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारली.
सामन्याचा पहिला क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आलं . मात्र, दुस-या क्वार्टरच्या सुरूवातीपासूनच भारताच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला.18 व्या मिनिटाला भारताचं गोलचं खातं उघडलं. स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवणा-या रूपिंदरपाल सिंगने 18 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचं रूपांतर गोलमध्ये केलं. लगेचच 23 व्या मिनिटाला अफ्फान युसूफने दुसरा गोल नोंदवत भारताची आघाडी 2- 0 ने वाढवली. मात्र, थोड्यावेळातंच पाकिस्तानने पाठोपाठ दोन गोल करत सामना बरोबरीत आणला. सामना संपायला थोडाच अवधी शिल्लक असताना कोण जिंकणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, 51 व्या मिनिटाला निक्किन थिमाय्याने रूपिंदरपाल सिंगच्या पासवर अप्रतिम गोल करत भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाकिस्तानने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी दवडली, आणि भारताने विजेतेपदावर नाव कोरलं.