पाकिस्तानचा पुन्हा धुव्वा

By admin | Published: June 25, 2017 12:09 AM2017-06-25T00:09:25+5:302017-06-25T00:09:25+5:30

हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात भारताला अपयश आले असले तरी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध आपली जबरदस्त कामगिरी पुढे सुरू ठेवली

Pakistan's rage again | पाकिस्तानचा पुन्हा धुव्वा

पाकिस्तानचा पुन्हा धुव्वा

Next

लंडन : हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात भारताला अपयश आले असले तरी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध आपली जबरदस्त कामगिरी पुढे सुरू ठेवली असून शनिवारी येथे झालेल्या सामन्यात त्यांनी पाकचा ६-१ असा धुव्वा उडवला.
भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर सलग दुसरा विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात पाकला ७-१ ने हरवले होते, तर आज ६-१ गोलने विजय मिळवला. भारताकडून रमणदीपसिंग आणि मनदीपसिंग यांनी प्रत्येकी दोन हरमनप्रीत आणि तलविंदरसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. एजाज अहमदने पाकिस्तानकडून एकमेव गोल केला.
सामन्याचा पहिला क्वार्टर भारताच्या नावावर राहिला. भारतीय खेळाडू पाकिस्तानी क्षेत्रातच जास्तवेळ दिसत होते. रमणदीपने आठव्या मिनिटाला रिव्हर्स प्लिकवर पाकिस्तानी गोलरक्षकाला चकवत पहिला गोल नोंदवला. त्यानंतर चार मिनिटांनी ही गोलसंख्या दुप्पट करण्याची आकाशदीपला संधी होती, परंतु तो अयशस्वी ठरला.
भारताला २-० ने आघाडी मिळवून देण्यास तलविंदरसिंगने कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाही. प्रदीप मोरच्या क्रॉसला त्याने डिफ्लेकट करीत गोल डागला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला गोल करण्याची चांगली संधी होती, परंतु भारतीय बचाव फळीने ती हाणून पाडली. २७ व्या मिनिटाला मनदीपसिंगने आपला पहिला गोल नोंदवला. त्यापाठोपाठ दुसऱ्याच मिनिटाला रमणदीपने गोल नोंदवला. या क्वार्टरमध्ये भारताने तीन
गोल नोंदवून ४-० अशी भक्कम आघाडी घेत पाकिस्तानकडून मध्यंतरालाच सामना हिसकावून घेतला होता.
३६ व्या मिनिटाला हरमनप्रीतने शॉर्ट कॉर्नरवरून गोल नोंदवत भारताची आघाडी ५-० अशी केली. याच तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकच्या एजाजने भारतीय बचावफळीतील गोंधळाचा फायदा घेत गोल नोंदवून पाकिस्तानचे खाते उघडले.
सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. यात मनदीपने रिबाउंडवर गोल नोंदवून भारताला
६-१ असा सोपा विजय मिळवून दिला. या पराभवामुळे पुढील वर्षी भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्डकपमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची पाकिस्तानची अपेक्षाही भंग पावली.

Web Title: Pakistan's rage again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.