पाकचा आॅस्ट्रेलियावर सहा विकेटसनी विजय
By admin | Published: January 16, 2017 05:20 AM2017-01-16T05:20:28+5:302017-01-16T05:20:28+5:30
पाकिस्तानने रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
मेलबोर्न : मोहम्मद आमिरसह गोलंदाजांनी केलेला अचूक मारा व प्रभारी कर्णधार मोहम्मद हफीज व अनुभवी शोएब मलिकची जबाबदारीपूर्ण खेळी याच्या जोरावर पाकिस्तानने रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
आमिरने ४७ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले, तर जुनेद खान व इमाद वसीम यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी परतविले. नाणेफेक जिंंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा डाव ४८.२ षटकांत २२० धावांत संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियातर्फे कर्णधार स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली.
नियमित कर्णधार अझहर अली दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाचे नेतृत्व करीत असलेल्या सलामीवीर हफीजने आपली भूमिका चोख बजाविताना १०४ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. त्याने शार्जिल खानसोबत (२९) सलामीला ६८ धावांची आणि बाबर आजमसोबत (३४) दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.
त्यानंतर अनुभवी मलिकने नाबाद ४२ धावांची खेळी करीत पाकिस्तानला ४७.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावांची मजल मारून दिली. मलिकने ५२ चेंडूंना सामोरे जाताना पाच चौकार व एक षट्कार लगावला. उमर अकमल १८ धावा काढून नाबाद होता.
आॅस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क (२-४५) व जेम्स फॉकनर (२-३५) यांनी चांगली गोलंदाजी केली; पण संघाचा पराभव टाळण्यात त्यांना अपयश आले. (वृत्तसंस्था)