पाकिस्तानचा द. आफ्रिकेवर विजय
By admin | Published: June 8, 2017 01:26 PM2017-06-08T13:26:48+5:302017-06-08T13:26:48+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत भारताविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाने करा अथवा मराच्या लढतीत आफ्रिकेचा डकवर्थ लुईस नियमानुसार19 धावांनी पराभव केला.
ऑनलाइन लोकमत
बर्मिंघम, दि. 8 : चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत भारताविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाने करा अथवा मराच्या लढतीत आफ्रिकेचा डकवर्थ लुईस नियमानुसार19 धावांनी पराभव केला. सतत पडणाऱ्या पावसामुळे हा सामनाही रद्द होणार असे वाटत होते. पण पाक फलंदाजांनी सुरुवातीपासूनच योग्य ती धावगती राखल्यामुळ्ये त्यांना विजयी घोषित केले. पहिल्या सामन्यात सुमार गोलंदाजी करणाऱ्या पाक संघाने दुसऱ्या सामन्यात दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चांगलेच अडचणीत आणले. त्यांनी द. आफ्रिकेला 50 षटकांत 8 बाद 219 धावांवर रोखले. 75 धावांवर नाबाद राहिलेल्या डेव्हिड मिलरने एकाकी झुंज देत आफ्रिकेचा डाव सांभाळला.
220 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने पावसाचा व्यत्यय येईपर्यंत पाकिस्तान संघाने 27 षटकांत तीन बाद 119 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 27 षटकांत 100 धावा करायच्या होत्या. पाकिस्तान संघाच्या 19 धावा जास्त आसल्यामुळे त्यांना 19 धावांनी विजयी घोषित केले.
त्यापूर्वी, बर्मिंघममध्ये द.अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर हशीम आमला आणि क्विंटन डी कॉक यांनी 40 धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज आफ्रिकेला चांगली धावसंख्या उभी करून देतील असे वाटत असतानाच इमाद वसीम याने आमलाला पायचीत पकडले. त्यानंतर 14 व्या षटकांत क्विंटन डी कॉकलाही मोहम्मद हाफीज याने तंबूत परत पाठवले. डी कॉक याने 49 चेंडूत 33 धावा केल्या. धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स याला इमाद वसीम याने पहिल्याच चेंडूवर खातेही उघडू न देता बाद केले. फाफ डु प्लेसीस याने 26 धावा केल्या. डेव्हिड मिलर याने 104 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अली याने ३ गडी बाद केले, तर जुनैद खान व इमाद वसीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.