अडवाणी-मेहरा यांनी पटकावले जागतिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:05 PM2019-09-25T23:05:27+5:302019-09-25T23:05:56+5:30
पंकजने आपल्या कारकिर्दीतील एकूण २३व्यांदा, तर आदित्यने पहिल्यांदाच जागतिक विजेतेपद पटकावले.
मंडाले: भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकानुसार दमदार खेळ करत आदित्य मेहतासह आयबीएसएफ जागतिक अजिंक्यपद सांघिक स्नूकरचे जेतेपद उंचावले. बुधवारी रात्री झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंकज-आदित्य यांनी थायलंड संघाला ५-२ असे पराभूत केले. विशेष म्हणजे पंकजने आपल्या कारकिर्दीतील एकूण २३व्यांदा, तर आदित्यने पहिल्यांदाच जागतिक विजेतेपद पटकावले.
अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने पहिली फेरी ६५-३१ अशी जिंकत सकारात्मक सुरुवात केली. यानंतर पंकजला ९-६९ पराभवाचा धक्का बसला, मात्र आदित्यने ५५ गुण मिळवत भारताला पुनरागमन करुन दिले. भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतल्यानंतर सलग दोन फ्रेम जिंकत बाजी मारली. आधी पंकजने ५२ ब्रेक गुण मिळवल्यानंतर अखेरच्या फ्रेममध्ये आदित्यने ८३-९ असे वर्चस्व राखत भारताच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ‘कारकिर्दीतील पहिले विश्वविजेतेपद रोमांचकारी आहे. इतक्या वर्षांच्या कठोर मेहनतीचे फळ आज मिळाले,’ अशी प्रतिक्रिया आदित्यने दिली. तसेच, पंकज म्हणाला की, ‘हा दौरा माझ्यासाठी स्वप्नवत ठरला. म्यानमार येथे तीन आठवड्यांपेक्षा कमी कलावधीमध्ये मी जागतिक स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य जिंकले. माझ्या संग्रहामध्ये केवळ याच स्पर्धेचे जागतिक जेतेपद नव्हते, पण आता हे जेतेपद पटकावल्याने माझ्यासाठी आकाश ठेंगणे झाले आहे.’