‘पंतां’नी मारले मैदान
By admin | Published: February 2, 2016 03:27 AM2016-02-02T03:27:40+5:302016-02-02T03:27:40+5:30
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (७८ धावा, २४ चेंडू) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय ज्युनिअर संघाने आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या
मिरपूर : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (७८ धावा, २४ चेंडू) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय ज्युनिअर संघाने आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात सोमवारी नेपाळचा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदविला.
भारताला उपांत्यपूर्व फेरीत नामीबिया किंवा बांगलादेशाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. डावखुरा फलंदाज पंतने अर्धशतकी खेळीत ९ चौकार व ५ षटकार ठोकले. त्याने अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वांत वेगवान अर्धशतकी खेळीची नोंद केली. भारताने विजयासाठी आवश्यक १७० धावांचे लक्ष्य केवळ १८.१ षटकांत पूर्ण केले. पंतने वैयक्तिक अर्धशतक केवळ १८ चेंडूंमध्ये झळकावले.
स्पर्धेतील ‘सरप्राईज पॅकेज’ नेपाळ संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना ऋषभ व कर्णधार ईशान किशन (५२) यांनी ९ षटकांमध्ये १२४ धावांची भागीदारी केली. त्याआधी, अवेश खानच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी नेपाळ संघाचा डाव ८ बाद १६९ धावांवर रोखला. अवेशने ३४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. वाशिंगटन सुंदर व मयंक डागर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. दिल्लीतील सोनेट क्लबमध्ये नियमित सराव करणाऱ्या ऋषभने दीपेंद्र एरीच्या गोलंदाजीवर ३ षटकार ठोकले. त्याला प्रेम तमांगने क्लीन बोल्ड केले. (वृत्तसंस्था)
न्यूझीलंडला विजयाचा दिलासा, आयर्लंडवर मात
फतुल्लाह : नेपाळ व भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेल्या न्यूझीलंड संघाला सोमवारी अखेरच्या साखळी लढतीत विजयाचा दिलासा मिळाला. फिन एलेनच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने आयर्लंडचा ४ गडी राखून पराभव केला.
‘ड’ गटातील या लढतीत आयर्लंडचा डाव ४७.५ षटकांत २१२ धावांत संपुष्टात आला. आयर्लंडतर्फे जॅक टेक्टर (५६), अॅडम डेनिसन (४६) आणि गॅरी मॅकक्लिनटाक (३४) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. न्यूझीलंडतर्फे रचिन रवींद्रा व जोश फिनी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
न्यूझीलंडने ४०.१ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २१३ धावा फटकावून विजयावर शिक्कामोर्तब केले. फिन एलेनने सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली, तर डेन फिलिप्सने ५८ व ग्लेन फिलिप्सने
३४ धावांचे योगदान दिले. आयर्लंडतर्फे रोरी अॅण्ड्रेसने
३२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. (वृत्तसंस्था)
अफगाणची कॅनडावर ४ गडी राखून मात
सिलहट : अफगाणिस्तानने आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत ‘ब’ गटात सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत कॅनडाचा ४ गडी राखून पराभव केला आणि पहिला विजय नोंदवला. कॅनडाचा डाव निर्धारित ५० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. कॅनडातर्फे अर्सलान खानने ३८, तर अबराश खानने ३३ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानतर्फे मुसलिम मुसा व शमसुर रहमानने प्रत्येकी ३ बळी घेतले. अफगाणिस्तानने केवळ २४.१ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावांची खेळी करून विजय साकारला. तारिक अफगाणिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ५६ धावांची खेळी केली. कॅनडातर्फे मिराज पटेलने ३ बळी घेतले.