पॅरा आशियाई; शरद कुमारला उंच उडीत विक्रमी सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:39 AM2018-10-12T01:39:57+5:302018-10-12T01:40:06+5:30
गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत गुरुवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता.
जकार्ता : गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत गुरुवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. दोन वर्षांचा असताना पोलिओविरोधी मोहिमेत बानावट औषधाचा डोस दिल्यामुळे शरदवर ही परिस्थिती ओढवली होती.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक विजेता असलेल्या २६ वर्षांच्या शरदने उंच उडीच्या टी-४२/६३ प्रकारात १.९० मीटर उडी घेत आशियाई तसेच स्पर्धा विक्रमांची नोंद केली. टी ४२/६३ प्रकार शरीराच्या खालच्या भागातील दिव्यांगाशी संबंधित आहे. आॅलिम्पिक कांस्य विजेता वरुण भाटी याने १.८२ मीटर उडी घेत रौप्य जिंकले. कांस्य थंगावेलू मरियप्पनला मिळाले. मरियप्पनने याच प्रकारात रियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते, हे विशेष.
ट्रॅक अॅण्ड फिल्ड प्रकारात आनंदन गुणसेकरमने टी ४४,६२/६४ प्रकारात रौप्य व विनय कुमारने कांस्य जिंकले. टी४५/४६/४७ प्रकारात संदीप मान याला कांस्य मिळाले. हे दोन्ही प्रकार पायाच्या वरील भागाच्या दिव्यांगाशी संबंधित आहेत. महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत (अंधत्व) राधा व्यंकटेशला कांस्य, तर जलतरणात स्वप्निल पाटीलला ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्यवर समाधान मानावे लागले.
गुर्जरला भालाफेकीत रौप्य; देवेंद्र झाझरियाकडून निराशा
भारताचा भालाफेकपटू सुंदरसिंग गुर्जर याने गुरुवारी पुरुषांच्या एफ ४६ प्रकारात रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी, दोन वेळेचा सुवर्ण विजेता, ‘खेलरत्न’चा मानकरी देवेंद्र झझारिया याने घोर निराशा केली. तो चौथ्या स्थानी राहिला.
एफ ४६ हा प्रकार शरीराच्या वरच्या भागातील दिव्यंगत्वाशी संबंधित आहे. ४०० मीटर शर्यतीत (टी१३) अवनिलकुमारने कांस्य जिंकले. टी१३ हा प्रकार अंधूक दिसण्याशी संबंधित आहे. गुर्जरने ६१.३३ मी. फेक करीत रौप्य जिंकले. रिंकूने ६०.९२ मी. वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीसह कांस्य जिंकले.