पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा! तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 05:10 PM2023-12-17T17:10:02+5:302023-12-17T17:10:37+5:30
पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला.
नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची थकलेली सुवर्ण पदकाची प्रतिक्षा शनिवारी तिरंदाज आदिल अन्सारीने पूर्ण केली. पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला. आदिल आणि नवीन ही जोडी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरीमधील सुवर्णपदक विजेती जोडी आहे. या दोघांमध्येच अंतिम झुंज होणार हे अपेक्षित होते. त्या प्रमाणेच झालेल्या या अंतिम लढतीत आदिलने पहिल्या सेटपासून एकतर्फी वर्चस्व राखले. यात दुसऱ्या सेटला दोनदा आणि चौथ्या सेटला दोनदा १० गुणांचा वेध घेत आदिलने आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर अखेरचा सेटही तेवढाच अचूक खेळत त्याने सुवर्णपदक निश्चित केले. नवीनला आज आदिलच्या सातत्यसमोर टिकताच आले नाही. त्याला लय गवसली नाही. मात्र, आता आम्ही दोघेही नव्याने पॅरा ऑलिम्पिकची तयारी करणार असल्याचे सांगितले.
डावपेच यशस्वी ठरल्याने चॅम्पियन : आदिल
पदार्पणामध्ये या स्पर्धेत चॅम्पियन होण्यासाठी मी खास डावपेच आखले होते. यामुळे मला यानुसार दर्जेदार कामगिरी करता आली. यातूनच मी चॅम्पियन होण्याचे स्वप्न यशस्वीपणे साकारले. यासाठी मला सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशा शब्दामध्ये आदिलने सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद व्यक्त केला.
आदिलची कामगिरी कौतुकास्पद : नीतू इंगोले
या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतची आदिलची कामगिरी कौतुकास्पद ठरली. याच दर्जेदार कामगिरीमुळे त्याला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवता आला. महाराष्ट्र संघासाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली. यातून महाराष्ट्र संघाच्या नावे तिरंदाजीमध्ये विक्रमी पदकाची नोंद झाली, अशा शब्दामध्ये मुख्य प्रशिक्षक नीतू इंगोले यांनी पदक विजेत्या आदिलच्या कामगिरीचे कौतुक केले.
महाराष्ट्राचे पुरुष खेळाडू अंतिम फेरीत
टेबल टेनिस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी अंतिम फेरी गाठली. मात्र, महिला विभागात महाराष्ट्राच्या खेळाडूंना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.
पुरुषांच्या पहिल्या एकेरीच्या उपांत्य लढतीत दत्तप्रसाद चौगुलेने तमिळनाडूच्या नितिशचे आव्हान कडव्या प्रतिकारानंतर ११-७, ११-५, ९-११, ११-८ असे परतवून लावले. त्यानंतर विश्व तांबेने अंतिम फेरी गाठताना दिल्लीच्या योगेश मुखर्जीचा एकतर्फी लढतीत ११-६, ११-७, ११-३ असा पराभव केला.
अशोक कुमार आणि रिषित नथवानी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातच्या ध्रुव योगेश चुघने अशोककुमारचा तीन सेटच्या लढतीत ११-६, ११-५, ७-११, ११-६ असा पराभव केला. पवन कुमार शर्माने महाराष्ट्राच्या रिषीत नथवानीचे आव्हान असेच तीन गेमच्या लढतीत ११-६, ११-७, १२-१०, ११-५ असे संपुष्टात आणले. महिलांमध्ये वैष्णवी सुतार आणि उज्वला चव्हा दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला. चंडिगडच्या पूनमने वैष्णवीचे आव्हान ११-८, ७-११, ११-६, ११-९ असे मोडून काढले. गुजरातच्या भाविका कुकोडियाने उज्वलाचा ११-३, ११-९, ११-७ अस पराभव केला.
महाराष्ट्राचे सहावे स्थान कायम
पदक तालिकेत महाराष्ट्र १० सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ ब्राँझ अशा २८ पदकांसह सहाव्या स्थानावर कायम आहे. हरियानाने पदकाचे शतक गाठले असून, आघाडी कायम राखताना त्यांना आतापर्यंत ३८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि २४ ब्राँझपदके मिळविली आहे. उत्तर प्रदेश (२४, २१, १०) दुसऱ्या, तमिळनाडू (१८, ७, १३) तिसऱ्या, गुजरात (१४, १८, १६) चौथ्या आणि राजस्थान (१०, २०, १३) पाचव्या स्थानावर आहेत.