पॅरा खेलो इंडिया स्पर्धा : महाराष्ट्राला पाचवे स्थान, अखेरच्या दिवशी टेबल टेनिसमध्ये दोन सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 07:47 PM2023-12-17T19:47:03+5:302023-12-17T19:47:30+5:30
महाराष्ट्राने १२ सुवर्ण, ७ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह पाचवे स्थान मिळविले.
नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने १२ सुवर्ण, ७ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह पाचवे स्थान मिळविले. स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदकांची कमाई करून दिली. महिला विभागात पृथ्वी बर्वेला रौप्यपदकाची मानकरी ठरली. नेमबाजीत महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले.
स्पर्धेत हरियाना ४० सुवर्ण, ३९ रौप्य आणि २६ कांस्य अशा १०५ पदकांसह आघाडीवर राहिले. उत्तर प्रदेशने (२५, २३ १४) अशा ६२, तमिळनाडूने (२०,८, १४) ४२, तर गुजरातने (१५, २२, २०) ५७ पदकांसह अनुक्रमे दुसरे,तिसरे आणि चौथे स्थान पटकावले.
टेबल टेनिसमध्ये दत्तप्रसाद, विश्वला सुवर्ण
टेबल टेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तरप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पृथ्वी बर्वेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या क्लास ९ प्रकारात दत्तप्रसदाने हरियानाच्या रविंदर यादवचे तगडे आव्हान ११-३, ११-८, ९-११, १२-१० असे परतवून लावले. क्लास १० प्रकारात विश्वने तेलंगणाच्या हितेश दलवाणीचा कडव्या संघर्षानंतर पाच गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत ११-७, ६-११, १३-११, १६-१८, ११-८ असा पराभव केला. दोन गेमची बरोबरी झाल्यावर निर्णायक पाचव्या गेमला विश्वने कमालीच्या एकाग्रतेने खेळ करताना एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. महिलांच्या क्लास ९-१० प्रकारात पृथ्वीला तमिळनाडूच्या बेबी सहानाचा प्रतिकार करता आला नाही. बेबीने सरळ तीन गेममध्ये ११-३, ११-६ आणि ११-३ असा विजय मिळविला.
नेमबाजीत महाराष्ट्र उपविजेते
नेमबाजी क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पदार्पणातच उपविजेतेपदाचा मान मिळविला. स्वरुप उन्हाळकर आणि वैभवराजे रणदिवे यांच्या महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा होता. कोल्हापूरच्या स्वरुपने पुरुषांच्या १० मीटर एअकर रायफल एसएच १ प्रकारात सुवर्ण, तर वैभवने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात एसएच १ प्रकारातच कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्याया यशाबद्दल प्रशिक्षक अनुराधा खुडे यांनी समाधान व्यक्त केले.