महिला स्विमरचा Video बनवल्या प्रकरणी दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 02:37 PM2018-03-01T14:37:46+5:302018-03-01T15:28:51+5:30
ख्यातनाम दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकरवर भारताच्या पॅरालिम्पिक समितीने तीन वर्षांची बंदी घातली आहे. प्रशांतने कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारतासाठी कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती.
नवी दिल्ली - ख्यातनाम दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकरवर भारताच्या पॅरालिम्पिक समितीने तीन वर्षांची बंदी घातली आहे. प्रशांतने कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारतासाठी कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. महिला जलतरणपटूचा स्विमिंग करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला म्हणून पॅरालिम्पिक समितीने प्रशांतवर इतकी कठोर कारवाई केली आहे. मागच्यावर्षी जयपूरमध्ये 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपची स्पर्धा झाली. त्यावेळी ही घटना घडली होती.
अर्जुन पुरस्कार विजेत्या महिला जलतरणपटूने लिखितमध्ये प्रशांत करमाकरची तक्रार केल्यानंतर पॅरालिम्पिक समितीने त्याला निलंबित केले होते. स्पर्धेदरम्यान प्रशांतने त्याचा कॅमेरा एका सहकाऱ्याकडे देऊन महिला स्पर्धकाचा स्विमिंग करतानाचा व्हिडिओ काढायला सांगितला होता. महिला स्पर्धकाच्या पालकांनी या व्हिडिओ चित्रीकरणावर आक्षेप घेत तक्रार केली. त्यावेळी पॅरालिम्पिक समितीचे चेअरमन डॉ. व्ही.के.दाबास यांनी व्हिडिओ काढणाऱ्याला बोलवून जाब विचारला. त्यावेळी त्याने आपण प्रशांत करमाकरच्या सांगण्यावरुन व्हिडिओ बनवत असल्याचे सांगितले.
त्यानंतर प्रशांत करमाकर विरोधात पुन्हा अशीच तक्रार आली. त्यावेळी करमाकर स्वत: ट्रायपॉडवर कॅमेरा ठेऊन चित्रीकरण करत होता. ज्यावेळी करमाकरला व्हिडिओ डिलीट करायला सांगितला त्यावेळी त्याने माझ्या माणसाला व्हिडिओ बनवण्यापासून का रोखले ? असा प्रतिप्रश्न करुन वाद घातला. त्याने पदाधिकाऱ्यांना त्याच्या विरोधात लिखित तक्रार आली आहे का? असे विचारले. त्यावेळी संबंधित मुलीच्या पालकांनी लिखित तक्रार नोंदवली. याच प्रकरणात त्याच्यावर तीन वर्ष बंदीची कारवाई केली आहे.