एका पायावर २ सुवर्णपदके जिंकणारा भाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 11:19 AM2024-09-04T11:19:11+5:302024-09-04T11:20:53+5:30
Paralympic Games: भालाफेक स्पर्धेत टोक्योला सुवर्ण जिंकलं; पण पॅरिसमध्ये तशीच कामगिरी पुन्हा करणं सोपं नव्हतं. ‘त्याला’ दुखापतीनं छळलं होतं, पाठदुखीने बेजार केलं होतं, टोक्योत नव्हतं ते अपेक्षांचं ओझंही त्याच पाठीवर होतं; पण त्याच्या भाल्यानं सुवर्णपदकावर पुन्हा नाव कोरलंच.
- अनन्या भारद्वाज
(मुक्त पत्रकार)
भालाफेक स्पर्धेत टोक्योला सुवर्ण जिंकलं; पण पॅरिसमध्ये तशीच कामगिरी पुन्हा करणं सोपं नव्हतं. ‘त्याला’ दुखापतीनं छळलं होतं, पाठदुखीने बेजार केलं होतं, टोक्योत नव्हतं ते अपेक्षांचं ओझंही त्याच पाठीवर होतं; पण त्याच्या भाल्यानं सुवर्णपदकावर पुन्हा नाव कोरलंच.
पॅराऑलिम्पियन सुमित अंतिलची ही गोष्ट. जे जे आवडतं, जे जे हवं ते ते मिळूच नये असं एखाद्याच्या वाट्याला सतत यावं तसं सुमितचं झालं. तो लहान होता तेव्हापासून त्याच्या आईच्या मनात होतं लेकानं खेळाडू व्हावं. ती त्याला खेळाडूंच्या गोेष्टी सांगत असे; पण तो ७ वर्षांचा असताना वडील गेले. ते भारतीय हवाईदलात नोकरीला होते; पण दीर्घकाळ आजारापुढे शेवटी हरले. ३ मुली व १ मुलगा असा परिवार मागे. आईनं हिमतीनं घर सावरलं; पण मुलगा खेळाडू होईल हे स्वप्न बाजूला ठेवावं लागलं. त्यात २०१५ मध्ये त्याचा अपघात झाला. बाइक चालवत शिकवणीवरून येत असताना ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. ट्रॅक्टर थेट त्याच्या अंगावरूनच गेला. त्या अपघातात त्याचा एक पाय निकामी झाला.
सुमितला कुस्तीपटू व्हायचं होतं. एका पायावर ते शक्य नव्हतं; पण २ वर्षांत तो सावरला. वर्ष २०१७ मध्ये भालाफेक कोच नितीन जयस्वाल यांच्याकडे त्याचं प्रशिक्षण सुरू झालं. तोवर त्याला या खेळाची काहीही माहिती नव्हती; पण त्याला एकच माहीत होतं, आपल्याला मिळालेली ही संधी आहे. हे नाहीतर पुढे काहीच नाही.
कठोर सराव करत त्यानं २०२० च्या टोक्यो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आणि आता सलग दुसरं सुवर्णपदक जिंकत पॅरिसमध्ये एफ ६४ कॅटेगरीत त्यानं ७०.५९ मीटर भाला फेकत स्वत:चाच विक्रम मोडला. जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत सुमित सांगतो, गेलं वर्षभर पाठ दुखत होतीच. मी आशियाई सुवर्ण कसाबसा जिंकलो त्यावेळी माझे फिजिओ चिडले. म्हणाले, जर गोड सोडलं नाहीस, कठोर डाएट केलं नाहीस तर काही खरं नाही. दोन महिन्यांत मी १२ किलो वजन कमी केलं. शिस्तीत सराव केला. सुवर्ण जिंकलो; पण माझे आताचे कोच अरुण कुमार खूश नसतील, त्यांच्यासाठी मी पुढच्या वेळी अजून जास्त मेहनत करणार हे नक्की!
दोन सुवर्णपदकं जिंकूनही पुढच्या वेळी अजून मेहनत करण्यासाठी सज्ज झालेला हा खेळाडू. त्याचा विक्रम फार मोलाचा आहे.