पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी; दोन्ही पाय नसलेल्या धावपटूची सुवर्णपदकाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 04:15 PM2024-09-09T16:15:08+5:302024-09-09T16:15:44+5:30
Paralympics 2024 : या धावपटूच्या पत्नीनेही पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुवर्णपदक जिंकले आहे.
Paris Paralympics Viral Video : पॅरालिम्पिक खेळांमध्ये दिव्यांग खेलाडू आपले नशीब आजमावतात. या खेळांमध्ये आपल्याला अनेक प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळतात. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्येही असे अनेक प्रसंग पाहयाला मिळाले, ज्यांनी जगाला नवीन प्रेरणा दिली. विशेष म्हणजे, यंदाच्या पॅरालिम्पिकमध्येही हात-पाय नसलेल्या अनेक खेळाडूंनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. यामध्ये दोन्ही पाय नसलेल्या धावपटूची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
पाय नसलेल्या धावपटूने जिंकले गोल्ड
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दोन्ही पाय नसलेल्या खेळाडूने धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरले. हंटर वुडहॉल असे या धावपटूचे नाव आहे. विशेष म्हणजे, त्याची पत्नी तारा डेव्हिस वुडहॉल हिने यापूर्वी पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये लांब उडी खेळात सुवर्णपदक जिंकले आहे. म्हणजेच, या दोघांनीही आपापल्या खेळात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. सध्या दाम्पत्याची सोसल मीडियावर चर्चा सुरू असून, नेटीझन्स त्यांना गोल्ड कपल असे नाव देत आहेत.
A husband and wife both win gold in the Olympics and Paralympics, thing you love to see 🏅❤️ pic.twitter.com/NT6jGxKLGP
— Captain Morocco🇲🇦 (@AtlasIion) September 7, 2024
कोणत्या देशाने किती पदके जिंकली?
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चीनने सर्वाधिक पदके जिंकली. 94 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त, चिनी खेळाडूंनी 76 रौप्य पदके आणि 50 कांस्य पदके जिंकली. अशा प्रकारे चीनच्या खेळाडूंनी एकूण 220 पदकांवर नाव कोरले. दुसऱ्या नंबरवर ग्रेट ब्रिटन आहे. 49 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त, ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी 44 रौप्य आणि 31 कांस्यपदक जिंकले. ग्रेट ब्रिटनने एकूण 124 पदके जिंकली. या यादीतील टॉप-5 देशांबद्दल बोलायचे झाले तर चीन व्यतिरिक्त ग्रेट ब्रिटन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नेदरलँड आणि ब्राझीलची नावे आहेत.
भारताची कामगिरी
भारतानेही या पॅरालिम्पिकमध्ये आपला जुना विक्रम मोडला. 7 सुवर्ण पदकांसह, भारतीय पॅरा ॲथलीट्सनी 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांवर नाव कोरले. अशा प्रकारे भारतीय खेळाडूंनी एकूण 29 पदके जिंकून इतिहास रचला. पदकतालिकेत भारत 18 व्या स्थानावर आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 20 पदके जिंकली होती. ज्यामध्ये 3 सुवर्ण पदकांसह 7 रौप्य पदक आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे.