नीरजला रौप्य! पाकिस्तानच्या नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह कमावलं गोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:04 AM2024-08-09T00:04:16+5:302024-08-09T01:38:04+5:30

140 कोटी भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन आर्मी मॅन नीरज चोप्रा भालाफेक करण्यासाठी मैदानात उतरला होता.

Paris 2024 Olympics Men’s Javelin Throw Final India’s defending Olympic champion Neeraj Chopra Win Gold Medal With Silver Arshad Nadeem Gold Medal With Olympic Record | नीरजला रौप्य! पाकिस्तानच्या नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह कमावलं गोल्ड

नीरजला रौप्य! पाकिस्तानच्या नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह कमावलं गोल्ड

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. 140 कोटी भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन आर्मी मॅन नीरज चोप्रा भालाफेक करण्यासाठी मैदानात उतरला होता. मैदानी क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिलं गोल्ड मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा यंदाच्या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण कामगिरी करून दाखवेल, अशी आशा तमाम भारतीयांना होती. पण यावेळी त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.   

ऑलिम्पिकमध्ये सेट झाला नवा रेकॉर्ड 

नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने 89.45 मीटर भाला फेकत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. त्याची हे कामगिरी पदक पक्के करण्यासाठी पुरेशी ठरली. दुसरीकडे नीरज चोप्राच्या आधी पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर अंतरावर भाला फेकत ऑलिम्पिक स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. यासह त्याने गोल्ड मेडलही पक्के केले. ग्रेनाडच्या अँडरसन पीटरसन याने 88.5 मीटर या कामगिरीसह कांस्य पदकावर नाव कोरलं. 

पाकिस्तानला वैयक्तिक तिसरे पदक, तेही गोल्ड

 1960 मध्ये रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मोहम्मद बशीर यांनी कुस्तीमध्ये 73 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली होती. याशिवाय 1986 मध्ये हुसैन शाह या खेळाडूनं बॉक्सिंगमध्ये पाकिस्तानला कांस्य पदकाची कमाई करून दिली होती. या दोन खेळाडूनंतर नदीम हा पाकिस्तानला पदक जिंकून देणारा केवळ तिसरा खेळाडू ठरला. 

भारताच्या खात्यात पहिलं रौप्य

नीरज चोप्राचं सुवर्ण पदक हुकले असले तरी दुसऱ्या स्थानावर राहून  गोल्डन बॉयनं खास विक्रम आपल्या नावे केले आहे. यंदाच्या  स्पर्धेतील भारताच्या खात्यात जमा झालेले हे पहिलं रौप्य पदक ठरलं. स्वातंत्र्यानंतर मैदानी खेळात दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सोनेरी क्षणाची अनुभूती दिल्यानंतर चंदेरी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. याशिवाय वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत  सुशील कुमार याच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.   

भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजांनी कमालीची सुरुवात केली. या क्रीडा प्रकारात 3 कांस्य पदके आली. त्यात मनू भाकर दोन पदकांची मानकरी ठरली.  त्यानंतर अखेरच्या टप्प्यात एका दिवशी दोन पदकांची भर पडल्याचे पाहायला मिळाले. नीरज चोप्राच्या रौप्य पदकाआधी  हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली होती.  

Web Title: Paris 2024 Olympics Men’s Javelin Throw Final India’s defending Olympic champion Neeraj Chopra Win Gold Medal With Silver Arshad Nadeem Gold Medal With Olympic Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.