कोण आहे मोना अग्रवाल? देशाला ब्राँझ मेडल मिळवून देणाऱ्या लेकीसंदर्भातील खास गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:22 PM2024-08-30T16:22:01+5:302024-08-30T16:44:45+5:30
३७ वर्षीय पॅरा शूटर मोना अग्रवाल हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीन प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक प्रमाणेच पॅरालिम्पिकमध्येही भारताने नेमबाजीतून पदकाची सुरुवात केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील गत चॅम्पियन अवनी लखेरा हिच्यासह 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात मोना अग्रवालनं भारताला पदक मिळवून दिले.
अवनीनं सेट केला नवा रेकॉर्ड, मोनानं तिसऱ्या क्रमांकावर राहत पक्क केले पदक
अवनी लखेरा हिने टोकियो पॅरालिम्पिक २४९.६ हा रेकॉर्ड मोडित काढत २४९.७ गुणांसह नवा विक्रम प्रस्थापित केला. दुसरीकडे मोना हिने २२८.७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. दक्षिण कोरियाच्या युनरी लीनं २४६.८ गुणांसह रौप्य पदक कमावले.
कोण आहे मोना अग्रवाल?
राजस्थानच्या सिकर येथे जन्मलेली मोना बालपणीच पोलिओमुळे प्रभावित झाली. चालण्यातील असर्थता, शिक्षणही पूर्ण न करू शकलेल्या या तरुणीनं संघर्षावर मात करत पॅरा शूटर होण्यासाठी जयपूरला आली. आज तिने पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाला पदकी कामगिरी करुन दिली आहे. उर्वरित इवेंटमध्येही ती असाच लक्षवेधी निशाणा साधेल, अशी अपेक्षा आहे.
एकूण तीन प्रकारात करणार भारताचे प्रतिनिधीत्व
३७ वर्षीय पॅरा शूटर मोना अग्रवाल हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीन प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. महिला १० मीटर एअर रायफल स्टँडिंग आर २ स्पर्धेत कांस्य पदक पटकवाणीर मोना मिश्र ५० मीटर रायफल प्रोन आर ६ आणि महिला ५० मीटर रायफल ३ पोझीशन आर ८ मध्येही भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल.
२०२१ मध्ये शूटिंगमध्ये आजमावला हात
व्हीलचेअरच्या आधारावर असणाऱ्या मोना अग्रवाल हिने गोळाफेक, थाळी फेक,भाला फेक आणि पॉवर लिफ्टिंग यासारख्या खेळात राज्यस्तरावर ओळख निर्माण केली. पण मैदानी खेळासाठी शरीर साथ देत नसल्यामुळे मोना हिने शूटिंगमध्ये हात आजमावण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये ती पॅरा शूटिंगमध्ये सक्रीय झाली होती.