अद्भुत... मनमोहक... अप्रतिम उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 10:37 AM2024-07-28T10:37:05+5:302024-07-28T10:37:52+5:30

या समारंभाचे वैशिष्ट्य काय होते यावर नजर...

paris olympic 2024 amazing captivating opening | अद्भुत... मनमोहक... अप्रतिम उद्घाटन

अद्भुत... मनमोहक... अप्रतिम उद्घाटन

अयाज मेमन कन्सल्टिंग एडिटर

ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदा उद्घाटन सोहळा सीन नदीच्या तीरावर मोठ्या दिमाखात पार पडला. एकापेक्षा एक मनमोहक दृश्ये सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाली. या समारंभाचे वैशिष्ट्य काय होते यावर नजर...

पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाने मागील उद्घाटन समारंभांच्या सर्व परंपरा मोडीत काढल्या. पॅरिसची प्रत्येक ऐतिहासिक इमारत सोहळ्याचा केंद्रबिंदू होती. ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच बोटींवर २०५ देशांची सुंदर 'परेड ऑफ नेशन्स' पार पडली. उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध पॅरिस कॅबरे, जनरल झेड, जेन नेक्स्ट नृत्य सादरीकरण, कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन, पॅरिस फॅशन कॉउचर, गॅस्ट्रोनॉमी आणि प्रसिद्ध पॅरिस ऑपेराचे सादरीकरण झाले. फ्रान्सच्या महान पॉप स्टार्सपैकी एक आका नाकामुरा हिने रिपब्लिकन गार्डचा ऑर्केस्ट्रा पोंट डेस आर्ट्सवर सादरीकरण केले.

आयफेल टॉवरवरील लेझर आणि लाइट प्रदर्शन प्रेक्षणीय होते. पॅरिसच्या ऐतिहासिक इमारतींच्या छतावर धावणारा आणि एका प्रसिद्ध लँडमार्कवरून दुसऱ्या ठिकाणी उडी मारणारा स्टंटमॅनचा ऑलिम्पिक टॉर्च रिले अविस्मरणीय ठरला. लुई व्हिटॉन फॅक्टरी आणि जगातील सर्वांत मोठ्या लॉरे म्युझियममध्ये प्रवेश करणारी ऑलिम्पिक मशाल सर्वात देखणी होती. म्युझियममधील प्राचीन पेंटिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या साहाय्याने जीव ओतण्यात आला. या पेंटिंग्सचे डोळे ऑलिम्पिक टॉर्चच्या दिशेने फिरत होते.

प्रत्येक सादरीकरणात निष्पक्षतेचा आणि लिंग समानतेचा संदेश होता. माजी दिव्यांग ऑलिम्पिकपटूंना ऑलिम्पिक मशाल सीन नदीच्या काठापासून लूवर संग्रहालयापर्यंत आणि अखेर ऑलिम्पिक ज्योतीच्या ठिकाणी ठेवण्याची संधी मिळाली. जार्डिन डेस दुइलेरीजस्थित असलेली ही क्रीडा ज्योत लॉवरे, प्लेस दे ला कॉनकॉर्ड, चॅम्प्स- एलिसेस आणि आर्क डी ट्रायम्फे यांच्या मधोमध आहे. ३० मीटर उंच असलेल्या या आकर्षक क्रीडा ज्योतीच्या सभोवताल गरम हवेच्या फुग्यासह ज्वालाची एक अंगठी पसरलेली दिसते. ४ तासांच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध फ्रेंच थिएटर दिग्दर्शक आणि अभिनेता थॉमस जॉली यांनी केले होते. या भव्यदिव्य पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचे वर्णन 'अद्भुत, अद्वितीय आणि अपवादात्मक!' असेच करता येईल.

दहा प्रकारांमध्ये दिसतो पदक जिंकण्याचा 'दम'

- भालाफेक : नीरज चोप्रा - टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्ण विजेता, कामगिरीत सातत्य, ९० मीटर भालाफेक करण्यास उत्सुक.

- बॉक्सिंग : लवलिना बोरगोहेन - टोकियो ऑलिम्पिकची कांस्य विजेती, महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपची कांस्य विजेती.

- बॉक्सिंग : निखत झरीन - दोन वेळेची विश्वविजेती, आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयश मागे टाकून पदक जिंकण्यास उत्सुक.

- भारोत्तोलनः मीराबाई चानू - टोकियो ऑलिम्पिकची रौप्य विजेती, जखमेवर मात करीत पुनरागमन करीत आहे.

- बॅडमिंटन: पी. व्ही. सिंधू - दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती, सुवर्ण जिंकून हॅट्रिक पूर्ण करण्यास सज्ज. प्रकाश पदुकोण यांना मेंटॉर बनविल्यापासून कामगिरी उंचावली आहे.

- बॅडमिंटन: सात्त्विक-चिराग - २०२२च्या थॉमस चषकात भारताला ऐतिहासिक जेतेपद मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले.

- नेमबाजी : सिफत कौर - २२ वर्षाची पंजाबची प्रतिभावान नेमबाज, महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये विश्व विक्रम, २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्णविजेती.

- हॉकी : पुरुष संघ - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले. ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपविला. भारतीय संघाला अतिशय कठीण ड्रॉ मिळाला. कर्णधार हरमनप्रीत आणि कोच फुल्टन यांचा संघ बलाढ्य संघांना धूळ चारण्यास इच्छुक,

- कुस्ती : विनेश फोगाट - कुस्ती महासंघाविरुद्ध वादामुळे वर्ष गेल्याने विनेशपुढे अवघड आव्हान असेल, वारंवार अन्याय झाल्यानंतरही संयम राखला, ५३ किलो गटात खेळली.

- कुस्ती : अंतिम पंघाल - विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती, जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर

Web Title: paris olympic 2024 amazing captivating opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.