दुहेरी पदकाचा ‘मनू’स्वी आनंद; मनू भाकर-सरबजित जोडीला पिस्टल मिक्स्डमध्ये कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:22 AM2024-07-31T06:22:36+5:302024-07-31T06:22:57+5:30
एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू स्वातंत्र्यानंतर पहिली भारतीय
पॅरिस : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या नेमबाजांनी भारतीयांना पुन्हा एकदा जल्लोषाची संधी देताना मंगळवारी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. मनू-सरबजोत यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात दक्षिण कोरियाच्या जोडीला नमवत कांस्य पटकावले. मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वातंत्र्यकाळानंतरची पहिली भारतीय ठरली. दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी मनू ही दुसरी भारतीय महिला, तर तिसरी भारतीय खेळाडूही ठरली.
खराब सुरुवात, नंतर झेप
भारतीय जोडीची सुरुवात खराब झाली. १३ सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पहिला सेट त्यांना गमवावा लागला. यानंतर भारतीयांनी जबरदस्त मुसंडी मारताना सलग चार सेट जिंकत ८-२ अशी आघाडी घेतली व ती कायम राखली. मनूने भारताच्या या दुसऱ्या पदकात मोलाची भूमिका निभावली. मिश्र सांघिक गटात सर्वप्रथम १६ गुणांची कमाई करणारा संघ विजयी ठरतो.
आता लक्ष्य ‘हॅट्ट्रिक’
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई केल्यानंतर मनू आता विक्रमी तिसऱ्या पदकासाठी सज्ज होत आहे. मनू आता २ ऑगस्टला २५ मीटर पिस्तूल पात्रता फेरीत खेळेल. त्यामुळे मनूकडे आता ऐतिहासिक कामगिरी करण्याची सुवर्ण संधी आहे.
शेवटच्या स्पर्धेसाठीही मी नक्कीच सर्वोत्तम कामगिरीचा पूर्ण प्रयत्न करेन. जर मी आणखी एक पदक जिंकू शकले नाही, तर कृपया नाराज होऊ नका. - मनू भाकर