'केस कापले, कपडे लहान केले...', वजन कमी करण्यासाठी विनेश फोगटने काय केले? IOA नं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 06:01 PM2024-08-07T18:01:06+5:302024-08-07T18:01:35+5:30
Paris Olympic 2024: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित केल्यानं संपूर्ण देशात विविध स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ५० किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेच्या फायनलला पोहचली होती. मात्र सामन्यापूर्वी विनेशचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्यानं तिला अपात्र घोषित केले. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून तिला बाहेर व्हावं लागलं आहे. विनेश फोगाट गोल्ड मेडलची प्रबळ दावेदार होती मात्र ऑलिम्पिकमधील या निर्णयानं प्रत्येकजण हैराण आहे. या प्रकरणी क्रीडा मंत्र्यांनी संसदेत उत्तर दिले. भारतीय ऑलिम्पिक संघाने याची तक्रारही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
विनेशला अपात्र घोषिक करणं धक्कादायक होतं असं पीटी उषा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, मी काही वेळापूर्वी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये विनेशची भेट घेतली. तिला IOA आणि पूर्ण देश तिच्या पाठिशी असल्याचं आश्वासन दिलं. आम्ही विनेशला सर्व प्रकारची मेडिकल हेल्प आणि मानसिक आधार देत आहोत. भारतीय कुस्ती महासंघाने यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंगशी संपर्क साधला आहे. मला विनेशच्या मेडिकल टीमद्वारे रात्रभर केलेल्या अथक प्रयत्नांची जाणीव आहे असंही त्यांनी म्हटलं.
विनेशकडून वजन कमी करण्यासाठी कठोर प्रयत्न
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी सांगितले की, विनेशने रात्रभर वजन कमी करण्यासाठी जे काही शक्य होतं ते सर्व प्रयत्न केले. ज्यात डोक्यावरील केस कापणे, कपडे छोटे करणे यांचाही समावेश आहे. सामान्यत: पैलवान आपल्या वजनापेक्षा कमी वजनी गटात भाग घेतो. त्याने त्यांना फायदा होतो कारण अशा स्थितीत ते समोरील कमकुवत स्पर्धकाशी लढू शकतो. वजन कमी करण्यासाठी खेळाडूला खूप घाम गाळावा लागतो. त्यासाठी खाणेपिणे यावर नियंत्रण ठेवावे लागते.
डाइटबाबत मुख्य आरोग्य अधिकारी काय बोलले?
वजन घटवल्यानंतर खेळाडू कमी वजनी गटात पात्र ठरतो परंतु त्यामुळे कमकुवत आणि ऊर्जाही कमी होते. त्यासाठी बहुतांश पैलवान सामन्यापूर्वी मर्यादित प्रमाणात पाणी आणि हाय एनर्जीवाले खाद्य पदार्थ घेतात. हे डाइट न्यूट्र्रीशियनिस्टच्या सल्ल्यानुसार घेतले जाते. विनेशच्या न्यूट्रीशियनिस्टनं म्हटलं की, ती सामान्य प्रमाणात डाइट करत होती. ती पूर्ण दिवसांत १.५ किलो ग्रॅम डाइट करायची जे पुढील सामन्यासाठी पर्याप्त एनर्जीसाठी पुरेसे आहे. कधी कधी सामन्यानंतर वजन वाढणे हेदेखील एक कारण असू शकते.