Paris Olympic 2024 : भारतानं जिंकलं हर'मन'! हॉकीत विजयरथ कायम; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:27 PM2024-07-30T18:27:09+5:302024-07-30T18:28:14+5:30

ind vs ire hockey olympic : आज भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला. 

Paris Olympic 2024 india vs ireland hockey olympics team India won 2-0, captain Harmanpreet singh performed well | Paris Olympic 2024 : भारतानं जिंकलं हर'मन'! हॉकीत विजयरथ कायम; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम 

Paris Olympic 2024 : भारतानं जिंकलं हर'मन'! हॉकीत विजयरथ कायम; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम 

india vs ireland hockey olympics | पॅरिस : न्यूझीलंडचा पराभव करून भारताच्या हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्यानंतरच्या सामन्यात अर्जेंटिनाविरूद्ध कसाबसा पराभव टाळून भारतीय संघाने आपला प्रवास अपराजित ठेवला. मंगळवारी भारत आणि आयर्लंड यांच्यात लढत झाली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदाच पहिल्या क्वार्टरमध्ये गोल करण्याची किमया साधली. मागील दोन सामन्यांमध्ये भारताला अखेरच्या क्षणी गोल करता आल्याने पराभव टाळता आला. आज मात्र काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. भारताने पहिल्याच क्वार्टरमध्ये गोल केल्याने आयर्लंडचे शिलेदार दबावात दिसले. (ind vs ire hockey news)

दुसऱ्या क्वार्टरच्या तिसऱ्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तेव्हा आयर्लंडच्या खेळाडूला चेंडू लागल्याने टीम इंडियाला आणखी एक संधी मिळाली. अखेर भारताने आणखी एक गोल करून २-० अशी आघाडी घेतली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने सलग दोन गोल करून चांगली आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने आपली आघाडी कायम ठेवली. हाफ टाइमपर्यंत भारताने २-० अशी आघाडी कायम ठेवली होती. 

तिसऱ्या क्वार्टरमधील पाचव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावेळी गोल करता आला नाही. आयर्लंडला पहिला पेनल्टी कॉर्नर तिसऱ्या क्वार्टरमधील अकराव्या मिनिटाला मिळाला. पण भारताने चांगल्या पद्धतीने बचाव करत आपली अप्रतिम कामगिरी सुरूच ठेवली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला पण वेळोवेळी भारताने चांगला बचाव करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवला. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत आयर्लंडचा संघ गोलाच्या शोधात राहिला पण त्यांना यश आले नाही.

अखेरच्या अर्थात चौथ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडसमोर 'करा किंवा मरा' अशी स्थिती होती. गोलसाठी तरसलेले आयरिश खेळाडू अनेक चुका करताना दिसले. क्वार्टरच्या पाचव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याशिवाय एका आयरिश खेळाडूला कार्ड दाखवण्यात आल्याने त्यांचा एक खेळाडू २ मिनिटांसाठी बाकावर बसला. पण, इथे भारतालाही फटका बसला... पेनल्टी कॉर्नरवर गोल मिळाला नाही... याशिवाय पंचांशी वाद घातल्याने कर्णधार हरमनप्रीत सिंगला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे दोन्हीही संघ १०-१० खेळाडूंसह दोन मिनिटे खेळले. सामन्याच्या शेवटच्या सात मिनिटांपर्यंत भारताकडे २-० अशी मजबूत आघाडी होती. ही आघाडी कायम ठेवण्यात भारतीय शिलेदारांना यश आले आणि विजयरथ कायम राहिला. अखेर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वातील भारताने आयर्लंडविरूद्ध २-० असा विजय मिळवला.

दरम्यान, भारताने तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक चार गोल करत मोर्चा सांभाळला. त्यामुळे हरमनच्या नेतृत्वातील संघाने तमाम देशावासियांची मनं जिंकली. 

Web Title: Paris Olympic 2024 india vs ireland hockey olympics team India won 2-0, captain Harmanpreet singh performed well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.