Paris Olympic 2024 : भारताच्या सिंधूचा दबदबा कायम! विजयी सलामी अन् मालदीवच्या खेळाडूचा दारूण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 01:30 PM2024-07-28T13:30:32+5:302024-07-28T13:43:02+5:30
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या मोठ्या सामन्यात महिला एकेरीच्या बॅडमिंटनमध्ये भारताने विजयाने सुरुवात केली.
Paris Olympic 2024 : पॅरिसमध्ये ऑलिम्पिकला सुरुवात झाली असून आज दुसरा दिवस सुरू आहे. सर्व भारतीयांच्या नजरा पीव्ही सिंधूकडे होत्या, पीव्ही सिंधूने कमालीची खेळी करत विजयी सलामी दिली. मालदीवच्या खेळाडूचा दारुण पराभव केला. या आधीही तिने सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकवून दिले होते. आता पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिक मारण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.
भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि मालदीवचा फातिमथ नब्बा अब्दुल रज्जाक यांच्यात सामना झाला. पीव्ही सिंधूने पहिला गुण मिळवून सामन्याला सुरुवात केली. मालदीवचे खेळाडूनेही चांगली सुरुवात केली होती. सिंधूने पहिला गेम २१-९ असा जिंकला तर दुसरा गेम २१-६ ने जिंकला. सिंधूने अवघ्या २७ मिनिटांत हा सामना संपवला.
पीव्ही सिंधू आणि मालदीवचा फातिमथ नब्बा अब्दुल रज्जाक यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पीव्ही सिंधूने पहिला गुण मिळवून सामन्याला सुरुवात केली. यानंतर हळूहळू गुणांमधील फरक वाढत गेला आणि तिला १० गुण मिळाले तर अब्दुल रज्जाकला ४ गुण मिळाले. सिंधूने १५-५ आणि नंतर २१-९ अशा मोठ्या फरकाने गेम सहज जिंकला.
पहिला गेम सहज जिंकल्यानंतर सिंधूने दुसऱ्या गेममध्येही आघाडी घेतली. सिंधूने मालदीवच्या खेळाडूविरुद्ध ४-० ने आगेकूच केली, अब्दुल रझाकने पुनरागमन केले आणि ३ गुण मिळवून स्कोअर ३-५ केला. पीव्ही सिंधूने आक्रमकता दाखवत पुन्हा स्कोअर लाइन १०-३ अशी करत मोठी आघाडी घेतली. दुसरा गेम २१-६ अशा फरकाने जिंकला.
विजयाचा आत्मविश्वास होताच
विजयानंतर पीव्ही सिंधूने सांगितले की, विजयाचा आत्मविश्वास होताच... कारण कसे खेळायचे याची पूर्ण तयारी झाली होती. सराव चांगला झाल्याने अधिक मदत झाली. कोणत्याच खेळाडूला हलक्यात घेऊन चालणार नाही हे ध्यानात होते. संधी मिळताच आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी दुखापत झाली होती, त्यामुळे शारिरीक दुखापतीसह मानसिक तणावही होता. या वर्षाच्या सुरुवातीला देखील दुखापत होती. पण, मी फ्रेब्रुवारीपासून तयारीला लागले. मला सपोर्ट स्टाफने खूप सहकार्य केले. प्रत्येक दिवस हा शिकण्यासारखा असतो असे मी म्हणेन. काही चुका होतात त्यावेळी माझे प्रशिक्षक मार्गदर्शन करत असतात. त्यांचे खूप आभार. ऑलिम्पिकमधील प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. त्यानुसार मी तयारी करत आहे.