Paris Olympic 2024 : सरकारने मनूच्या प्रशिक्षणासाठी २ कोटी खर्च केले; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 02:22 PM2024-07-29T14:22:06+5:302024-07-29T14:22:14+5:30
भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले.
manu bhaker news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले. तिच्या या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यंदाच्या ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा झाला. नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. यांसह, ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. अंतिम फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले. जिन ओह आणि येजी किम या दक्षिण कोरियन नेमबाजांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले.
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मनू भाकरचे कौतुक करताना विविध बाबींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्य पदक जिंकून भारताचा गौरव केला आहे. ती 'खेलो इंडिया'चा एक भाग आहे. पंतप्रधान मोदींनी 'खेलो इंडिया'ला सुरुवात केली हे सांगताना मला आनंद होत आहे. त्यांच्या या उपक्रमांतर्गत देशात क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. तसेच खेळाडूंना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची खात्री करण्यासाठी TOPS योजनेअंतर्गत माहिती घेण्यात आली. क्रीडा मंत्री ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
मनूच्या प्रशिक्षणासाठी २ कोटींचा खर्च
मनसुख मांडविया पुढे म्हणाले की, मनू भाकरवर सुमारे २ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तिला जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. इतर खेळाडूही ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करतील असा विश्वास आहे. मनूच्या प्रशिक्षणासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. तिने जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षण घेतले. सरकारतर्फे आर्थिक सहाय्य प्रदान केले गेले, जे तिला हवे असलेले प्रशिक्षक भाड्याने देण्यासाठी आवश्यक होते.