Paris Olympic 2024 : पीव्ही सिंधूला ट्रोलर्सपासून वाचवण्यासाठी मी फेक अकाउंट काढलं होतं - मनू भाकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:04 PM2024-07-30T23:04:22+5:302024-07-30T23:12:54+5:30
India in Olympics 2024 : मनू भाकरने दोन कांस्य पदक जिंकली.
रविवारचा तो दिवस आणि मनू भाकर तमाम भारतवासियांना आपलेसे करण्यात यशस्वी झाली. अचूक नेम धरत तिने कांस्य पदकावर निशाणा साधला. भारताची महिला नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना दोन कांस्य पदक जिंकण्याची किमया साधली. रविवारी मनू भाकरने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले होते. मंगळवारी यात भर पडली असून, तिने सरबजोत सिंगसोबत आणखी एका पदकाला गवसणी घातली. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला. याआधी रविवारी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे.
कांस्य जिंकणारी मनू प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिने आता पीव्ही सिंधूबद्दलचे प्रेम सांगताना एक भारी किस्सा सांगितला. मनू भाकरने स्पोर्ट्स स्टारशी बोलताना सांगितले की, पीव्ही सिंधू ही दिग्गज खेळाडू आहे. नीरज चोप्रा आणि यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. बॅडमिंटनपटू सिंधू खूप मेहनती आहे. तिचा ट्रोलर्सपासून बचाव करण्यासाठी मी एक फेक अकाउंट काढले होते. सोशल मीडियावर ट्रोल करणारे खूप असतात. आगामी काळात येणाऱ्या ॲथलीट्ससाठी मी सांगेन की, त्यांनी खूप मेहनत करावी आणि आत्मविश्वास बाळगायला हवा. मनू भाकरच्या या प्रतिक्रियेवर व्यक्त होताना सिंधू म्हणाली की, हा हा स्वीटहर्ट... मनू ऑलिम्पिकमधील २ पदक विजेत्या क्लबमध्ये तुझे स्वागत.
Haha what a sweetheart!!!
— Pvsindhu (@Pvsindhu1) July 30, 2024
Welcome to the 2 Olympic medal club Manu!! Way to go 💪 ❤️@realmanubhakerhttps://t.co/B8uY1kF0PH
टोकियोत अश्रू अन् पॅरिसमध्ये आनंदाचे अश्रू
पिस्तूल खराब झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूला पुढील फेरी गाठता आली नव्हती. स्पर्धेबाहेर होताच ती भावुक झाली होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते. नेमबाज मनू भाकरने आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले. ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सर्वात आशादायी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून तिने ओळख मिळवली. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला आणि नेमबाजीमध्ये तिची आवड निर्माण होण्यापूर्वी बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगसारख्या इतर खेळांमध्ये नशीब आजमावले. आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत.