पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा ‘रंग’ उडाला; निकृष्ट दर्जाचे पदक मिळाल्याचा खेळाडूंनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 06:57 AM2024-08-12T06:57:06+5:302024-08-12T07:01:02+5:30
रंग निघून गेलेल्या आपल्या कांस्यपदकाचा फोटोही केला पोस्ट
पॅरिस: ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते. यासाठी खेळाडू जीवापाड मेहनत घेतो. परंतु, हे ऑलिम्पिक पदक खराब निघाले, तर काय? अगदी अशीच अवस्था पॅरिस ऑलिम्पिकमधील काही पदक विजेत्यांची झाली आहे. ब्रिटनची कांस्यपदक विजेती यास्मिन हार्परने हा दावा केला आहे की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडालाय. यास्मिनने सोशल मीडियावर या रंग निघून गेलेल्या आपल्या कांस्यपदकाचा फोटोही पोस्ट केला आहे. यास्मिनने १०० मीटर सिंक्रोनाइस स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य कमाई केली होती.
हे ऑलिम्पिक पदक नवे करकरीत असतानाच चांगले वाटते; पण थोड्या वेळाने आपल्या त्वचेवरील घाम या पदकावर लागल्यानंतर आणि मित्रांकडे काहीवेळ दिल्यानंतर या पदकाचा दर्जा समोर दिसून येतो. हे पदक मिळून केवळ एक आठवडाच झाला आहे. या पदकाची समोरील बाजू काहीशी उखडू लागली आहे. कशामुळे ते माहीत नाही. बहुतेक याचा दर्जा वाढवायला हवा.
- नायजा हस्टन, अमेरिकन कांस्य विजेता, स्ट्रीट स्केटबोर्ड
पदकाचा रंग उडाल्याच्या घटनांवर अद्याप पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
यांचीही तक्रार...
अमेरिकेच्या स्केटबोर्ड संघातील खेळाडूंनीही याबाबत तक्रार केली आहे. कांस्यपदकाचा केवळ रंगच उडाला नसून मागच्या बाजूने हे पदक तुटल्याचेही अमेरिकन खेळाडूंनी सांगितले. ‘हे काहीसे निराशाजनक आहे. केवळ एक आठवडा हे पदक चमकत होतं,’ असे यास्मिनने म्हटले.