Swapnil Kusale : जगात भारी ठरलेल्या स्वप्निलचं कोल्हापुरी थाटात 'नाद खुळा' स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 10:25 AM2024-08-21T10:25:12+5:302024-08-21T10:31:13+5:30

पॅरिसमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर मायदेशी परतल्यावर स्वप्निल पहिल्यांदाच आपल्या गावी आलाय. 

Paris Olympic Medal Winner Swapnil Kusale Grand Welcome In Kolhapur | Swapnil Kusale : जगात भारी ठरलेल्या स्वप्निलचं कोल्हापुरी थाटात 'नाद खुळा' स्वागत

Swapnil Kusale : जगात भारी ठरलेल्या स्वप्निलचं कोल्हापुरी थाटात 'नाद खुळा' स्वागत

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पदकी निशाणा साधणारा भारतीय नेमबाज  स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत क्रीडा जगतात भारताची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी त्याने करून दाखवली आहे. स्वप्निल कुसाळे याने महाराष्ट्राचा ७२ वर्षांचा पदकी दुष्काळ संपुष्टात आणत नवा इतिहासही रचला. पॅरिसमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर मायदेशी परतल्यावर  स्वप्निल पहिल्यांदाच आपल्या गावी येतोय.

ऑलिम्पिक चॅम्पिनयच्या आगमनामुळे कोल्हापूर नगरीत जल्लोषमय वातावरण 

कांबळवाडीतील आपल्या घरी पोहचण्याआधी कोल्हापुरात त्याच्या स्वागतासाठी कमालीचा उत्साह दिसून आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑलिम्पिक चॅम्पियनच्या स्वागताची खास तयारी करण्यात आली आहे. "कोल्हापुरी जगात भारी" ही गोष्ट जगातील मानाच्या स्पर्धेत साध्य करून दाखवणाऱ्या स्वप्निलच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांनी नाद खुळा तयारी केल्याचे पाहायला मिळाले. डोक्यावर फेटा आणि हातात पदक घेऊन स्वप्निलची अगदी ऐटीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील क्षण डोळ्याचे पारणे फेडणारे असेच आहेत. हेलिकॉप्टरमधून त्याच्यावर पुष्पवृष्टीचा वर्षावही करण्यात आला.

नव्या हिरोच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांमध्येही दिसला कमालीचा उत्साह

ताराराणी चौकापासून ते दसरा चौकापर्यंत ढोल ताशा, हलगी आणि झांजपथकाच्या गजरात स्वप्निलची मिरवणूक काढण्यात येत आहे. कांबळवाडी या छोट्याशा गावातून  जगातील मानाच्या स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या स्वप्निलच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांमध्येही कमालीचा उत्साह दिसून येतोय. मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्याच्या कडेनं शाळेतील मुलेही त्याच्या  स्वागतासाठी उभी आहेत. कारण स्वप्निल आज या सर्वांसाठी नवे प्रेरणास्थान बनला आहे.   

त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीला तोड नाही

स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात पदकी निशाणा साधला होता. कांस्य पदकासह त्याने नेमबाजीत नवा विक्रमही प्रस्थापित केला. रायफल थ्री पोझीशन प्रकारात भारताला पदक मिळवून देणारा तो पहिला नेमबाज आहे. एवढेच नाही तर खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणारा महाराष्ट्राचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.

Web Title: Paris Olympic Medal Winner Swapnil Kusale Grand Welcome In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.