अन् मी त्याच्यावर ओरडले; ग्रँड वेलकमनंतर कोच मॅडमनीं शेअर केला स्वप्निलसंदर्भातील किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 03:14 PM2024-08-21T15:14:29+5:302024-08-21T15:24:13+5:30
डोळं बंद केल्यावर तुला समोर कोणते टार्गेट दिसते? प्रशिक्षकांचा कधी ओरडा खाल्ला आहेस का?
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणारा भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात जंगी स्वागत झाले. ऑलिम्पिक चॅम्पियनच्या स्वागतासाठी शहराच्या रस्त्यांवर लहान-थोरांनी मोठी गर्दी केल्याचा सीन पाहायला मिळाला. हा क्षण चॅम्पियन खेळाडूसाठी देखील अविस्मरणीय ठरला.
ऑलिम्पिक चॅम्पियन स्वप्निलनं मनापासून मानले कोल्हापुरकरांचं आभार
जंगी मिरवणुकीनंतर स्वप्निल कुसाळे याने पत्रकारांशी संवाद साधताना ही गोष्ट बोलूनही दाखवली. कोल्हापुरात आल्यावर एवढ्या दणक्यात स्वागत होईल, याची कल्पना केली नव्हती, या आशयाच्या शब्दांत त्याने कोल्हापुरकरांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी स्वप्निलला पत्रकारांनी वेगवेगळे प्रश्न विचारले.
पुढचं टार्गेट गोल्ड!
डोळं बंद केल्यावर तुला समोर कोणते टार्गेट दिसते? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, आपण कोणतं टार्गेट पाहतोय, त्यावर ते अवलंबून असते. माझं पहिल्यापासून एकच स्वप्न आहे, ते म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड. ते स्वप्न अजून साकार झालेले नाही, असे म्हणत आगामी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण वेध साधण्यासाठी प्रयत्नशील असेन, असे तो म्हणाला.
छोट्या चुकीमुळं कधी प्रशिक्षकांचा ओरडा खाल्ला आहेस का? स्वप्निलनं हसत हसत दिला असा रिप्लाय
प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये एखाद्या छोट्या चुकीमुळे प्रशिक्षकांनी रागवल्याचा घटना कधी घडली आहे का? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. यावर हसत हसत त्याने बाजूला बसलेल्या कोच मॅडमच ते सांगू शकतात असे म्हटले. एवढेच नाही त्या माझ्यासाठी आईसमान आहेत. जरी त्या काही बोलल्या असतील तर त्याला राग नाही तर ती शिकवण आहे, असे त्याकडे पाहिले पाहिजे, अशा शब्दांत त्याने आपल्या प्रशिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला.
मग प्रशिक्षक मॅडम दिपाली देशपांडे यांनी सांगितला स्वप्निलला ओरडल्यासंदर्भातील किस्सा
या पत्रकार परिषदेत स्वप्निलच्या कोच मॅडम दिपाली देशपांडेही उपस्थितीत होत्या. स्वप्निल संदर्भात त्या म्हणाल्या की, तो एक साधा सरळ मुलगा आहे. जे ठरवतो ते करून दाखवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. तो माझ्याकडे पुण्यात आला त्यावेळी मी ज्युनिअर टीमची कोच होते. साडेपाचला बोलावलं तर तो त्यावेळी हजर असायचा. त्यामुळे त्याच्यावर ओरडण्याची वेळ तशी कधी आली नाही. पण एकदा त्याच्यावर खूप चिडले होते. स्वप्निलची टीम मेडलसाठी स्टाँग होती. मॅच दुपारी असल्यामुळे ही सर्व मुले रुमवर जाऊन झोपली. ज्यावेळी मॅचसाठी ते रेंजवर आले त्यावेळी सर्वांचे डोळे सुजलेले होते. झोप घेऊन आलेत ते दिसून येत होते. त्यावेळी एकदाच त्याला ओरडा पडला होता, असा किस्सा स्वप्निलच्या प्रशिक्षका दिपाली देशपांडे यांनी शेअर केला.