Neeraj Chopra : गो फॉर गोल्ड! नीरज चोप्राकडे महा पराक्रमाची 'सुवर्ण' संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 06:06 PM2024-08-07T18:06:44+5:302024-08-08T13:37:39+5:30
तो यशस्वी ठरला तर सलग दोन वेळा सुवर्ण पदकाची कमाई करणारा तो पहिला भारतीय ठरेल.
अभिजीत देशमुख, पॅरिसहून
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत 3 पदकं जमा झाली आहेत. पहिल्या आठवड्यात वेगवेगळ्या खेळ प्रकारात भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशीही पडली. त्यात विनेश फोगाटच्या अपात्रतेमुळे भारताला एक मोठा धक्काही बसला आहे.
एका बाजूला विनेश फोगाटचा मुद्दा चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला भारतीयांच्या नजरा गोल्डन बॉय नीरज चोप्रावर खिळल्या आहेत. 8 ऑगस्ट रोजी 'लव्ह ऑफ सिटी' पॅरिसमध्ये नीरज चोप्रा देशवासियांना पुन्हा एकदा सुवर्ण क्षणांची अनुभूती देईल, अशी अपेक्षा आहे.
नीरज चोप्रा कमालीच्या सातत्यासह दृढ निश्चयासह ध्येय साध्य करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याने वेगवेगळ्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीसह आपल्यातील कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. आता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत त्याच्याकडून दमदार आणि अभिमानास्पद अशा कामगिरीची अपेक्षा आहे.
महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अधिक वजन असल्यामुळे अपात्र ठरली. या घटनेमुळं भारताच्या अपेक्षांना जणू एकप्रकारचा सुरुंगच लागला. त्यामुळेच आता नीरज चोप्राची कामगिरी ही फक्त वैयक्तिक नसून भारतीय ताफ्यात एक संजीवनी देणारी ठरेल.
ज्या मैदानी खेळात (अॅथलेटिक्स) परदेशी खेळाडूंचा बोलबाला आहे, तिथं नीरज चोप्रा भारताची एक वेगळी ओळख निर्माण करताना दिसतोय. पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याची कामगिरी या क्रीडा प्रकारातील भारताचे भवितव्य अधिक उज्वल करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. तरुण खेळाडूंना ध्येय सेट करण्यासाठी तो आणखी उदाहरण सेट करेल. या वेगवेगळ्या पैलूंमुळे नीरज चोप्राचा इवेंट अधिक खास आणि आकर्षक ठरतो.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही नीरज चोप्रासाठी फक्त स्पर्धा नाही. पुन्हा एकदा नवा इतिहास रचण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात तो यशस्वी ठरला तर सलग दोन वेळा सुवर्ण पदकाची कमाई करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल. या ऐतिहासिक कामगिरीसह एक नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी त्याच्याकडे आहे.
भारतीयांना देखील नीरज चोप्राकडून अशाच अभिमानास्पद कामगिरीची अपेक्षा आहे. जर त्याने अपेक्षेला साजेसा खेळ केला तर मैदानी क्रीडा प्रकारात भारत एका विशेष उंचीवर पोहचेल, ही गोष्ट नव्या पिढ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करेल.