मार मुसंडी! कुस्तीपटू अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, पदकाची आस वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:52 PM2024-08-08T16:52:14+5:302024-08-08T17:09:34+5:30
Aman Sehrawat Wrestling, Paris Olympics 2024: अमन सेहरावत याने पदकाच्या दिशेनं मुसंडी मारली आहे. आखाड्यातून पदक येणार?
Aman Sehrawat Wrestling, India at Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात आखाड्यातून पदकाची आस वाढली आहे. भारताचाकुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याने 57 किलो वजनी गटात झालेल्या लढतीत अल्बेनियाच्या जेलिमखान एबकारोवला पराभूत केले. एका बाजूला महिला गटात अंशु मलिकला पराभवाचा सामना करावा लागला असताना अमन सेहरावत याने पदकाच्या दिशेनं मुसंडी मारली आहे.
आक्रमक अंदाजानं प्रतिस्पर्ध्याला बॅकफूटवर ढकललं
अमन सेहरावत याने क्वार्टर फायनल लढतीत सुरुवातीच्या फेरीपासूनच आपली पकड मजबूत करण्यावर भर दिला. आक्रमक खेळ दाखवत त्याने अल्बेनियाच्या पैलवानाला बॅकफूटवर ढकलले. त्याचा आक्रमक तोरा पाहून जेलिमखान एबकारोव हा बचावात्मक खेळताना दिसला. याचा फायदा उठवत अमन सेहरावत याने संधीच सोनं करत परफेक्ट डाव टाकून 3-1 अशी आघाडी घेतली होती.
मग खेळला 8 गुण मिळवून देणारा जबऱ्या डाव
अमन सेहरावत याने दुसऱ्या फेरीत आक्रमकता आणखी वाढवली. दुसऱ्या मिनिटात त्याने 8 अंक मिळवून देणारा डाव खेळला. ज्यात त्याने प्रतिस्पर्धी एबकारोव याला तीन वेळा फिरवले. पहिल्या फेरीतील 3 गुण आणि त्यानंतर 8 अंक मिळवून देणारा डाव खेळत अमन सेहरावत याने 11-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर टेक्निकल सुपपीरियॉरिटीनुसार त्याला विजयी घोषित करण्यात आले.
सेमीफायनलमध्ये या पैलवानाविरुद्ध भिडणार अमन
अमन सेहरावत याची सेमीफायनलमधील लढत ही जपानच्या रेई हिगुची याच्याविरुद्ध रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, गुरुवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी ही लढत रंगणार आहे. जपानी कुस्तीपटूनं 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. त्याला चीतपट करत फायनल खेळण्याच्या इराद्यानेच अमन सेहरावत आखाड्यात उतरेल.
एक नजर अमन सेहरावतच्या लक्षवेधी कामगिरीवर
हरियाणाच्या या 21 वर्षीय मल्लानं 2022 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कांस्य पदक कमावले होते. 2023 मध्ये कझाकिस्तान येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीतील सातत्य राखून सोनेरी डाव खेळण्याची संधी त्याच्याकडे आहे. यासाठी आधी त्याला जपानी कुस्तीपटूला आसमान दाखवावं लागेल. ही लढत जिंकली की, भारताचे आणखी एक पदकं निश्चित होईल.