विनेशने उपांत्य फेरी गाठताच बजरंग पूनियाचा घणाघात, म्हणाला, ‘’या मुलीला आपल्यात देशात…’’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:43 PM2024-08-06T20:43:20+5:302024-08-06T20:47:44+5:30
Paris Olympics 2024: भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. विनेशने कुस्तीच्या आखाड्यात केलेल्या दमदार कामगिरीनंतर बजरंग पूनिया याने सोशल मीडियावरून घणाघाती पोस्ट करून टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने दमदार कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील आपल्या विजयी घोडदौडीदरम्यान, विनेशने तिच्या पहिल्याच लढतीत जपानच्या सुवर्णपदकविजेत्या सुई सुसाकी हिचा ३-२ ने पराभव केला. तर उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाच हिला पराभूत केलं. दरम्यान, विनेशने कुस्तीच्या आखाड्यात केलेल्या दमदार कामगिरीनंतर बजरंग पूनिया याने सोशल मीडियावरून घणाघाती पोस्ट करून टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये बजरंग म्हणाला की, विनेश फोगाट ही भारताची ती वाघीण आहे जिने आज पाठोपाठच्या सामन्यांमध्ये चार वेळची विश्वविजेती आणि विद्यमान ऑलिम्पिक विजेतीला पराभूत केलं. त्यानंतरच्या सामन्यामध्ये तिने माजी विश्वविजेतीला पराभूत केलं. मात्र एक सांगायचं म्हणजे याच मुलगीला तिच्या देशामध्ये लाथांनी चिरडलं गेलं होतं. तिला देशातील रस्त्यांवरून फरफटत नेण्यात आलं होतं. ही तरुणी जग जिंकणार आहे. मात्र या देशातील व्यवस्थेकडून ती पराभूत झाली होती.
बजरंग पूनिया याने सरकार आणि बृजभूषण शरण सिंह यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा आम्ही जंतर मंतरवर आंदोलन करत होतो. तेव्हा आमच्याबाबत खूप काही सांगितलं गेलं होतं. आता विनेशने एवढं मोठं यश मिळवल्यानंतर तिला ते देशाची कन्या म्हणणार का, असा सवालही त्याने विचारला.
विनेश फोगाट भारत की वो शेरनी जिसने आज बैक टू बैक मैच में
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) August 6, 2024
4 बार की World Champion और मौजूदा ओलंपिक चैंपियन को हराया
उसके बाद क्वार्टरफाइनल में पूर्व World Champion को हराया
मगर एक बात बताऊं,
ये लड़की अपने देश में लातों से कुचली गई थी
ये लड़की अपने देश में सड़कों पर घसीटी गई…
विनेश फोगाट हिने कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच सहकारी कुस्तीपटूंसोबत दिल्लीमध्ये आंदोलनही केलं होतं. त्यावेळी विनेश फोगाट हिला सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र आता विनेशने तिच्या कामगिरीमधून या सर्वांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.