गणपती बाप्पा मोरया! मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची लांबलचक पोस्ट; 'दुसऱ्या आई'चे आभार मानले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 03:03 PM2024-08-07T15:03:53+5:302024-08-07T15:13:09+5:30

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले.

Paris Olympics 2024 bronze medalist Swapneel Kusale thanks everyone, calls his coach Deepali Deshpande his mother | गणपती बाप्पा मोरया! मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची लांबलचक पोस्ट; 'दुसऱ्या आई'चे आभार मानले

गणपती बाप्पा मोरया! मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची लांबलचक पोस्ट; 'दुसऱ्या आई'चे आभार मानले

paris olympics 2024 updates : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी तिसरे पदक जिंकणारा मराठमोळा शिलेदार स्वप्नील कुसाळे. कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने मागील बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. पण, अखेरच्या काही क्षणांमध्ये स्वप्नील इतर पाच खेळाडूंना वरचढ ठरला आणि त्याने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली. आता स्वप्नीलने एक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

स्वप्नील कुसाळेने पदकासोबतचा फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले. त्याने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, गणपती बाप्पा मोरया. भारतासाठी हे पदक जिंकू शकलो याचा अभिमान वाटतो. पण तरीही मी माझ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा प्रवास खडतर होता, माझी शारीरिक आणि मानसिक परीक्षा होती. मी कधीही हार मानली नाही, नेहमी देवावर विश्वास ठेवला. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्या कुटुंबीयांनी मला खूप मदत केली.

स्वप्नीलने मानले सर्वांचे आभार
तसेच माझी दुसरी आई अर्थात माझ्या कोच दिपाली देशपांडे मॅडम यांचे खूप खूप आभार. २०१२ पासून त्या मला मार्गदर्शन करत आहेत. त्यांनीच मला शिस्त आणि खऱ्या अर्थाने नेमबाजी शिकवली आहे. या यशाबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे. माझ्या या वाटेत मदतीला आलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. हे पदक फक्त माझे नाही तर ते प्रत्येकाचे आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या पाठीशी उभे राहिले आणि प्रत्येक आव्हानात मला मदत केली त्या सर्वांचे हे पदक आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाचा मी सदैव ऋणी आहे, अशा शब्दांत स्वप्नील कुसाळेने सर्वांचे आभार मानले. 


ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून फक्त खाशाबा जाधव यांच्या नावाची नोंद होती. यात आता भर पडली असून तब्बल ७२ वर्षांनंतर स्वप्नीलच्या रूपात मराठमोळ्या खेळाडूला पदक जिंकण्यात यश आले. स्वप्नील हा कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील रहिवासी आहे. २९ वर्षीय स्वप्नीलने २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला १२ वर्षे वाट पाहावी लागली. धोनीला आदर्श मानणाऱ्या स्वप्नीलने कॅप्टन कूलच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट अनेकदा पाहिला. दरम्यान, १९५२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू बनण्याची संधी स्वप्नीलने मिळवली आहे.

Web Title: Paris Olympics 2024 bronze medalist Swapneel Kusale thanks everyone, calls his coach Deepali Deshpande his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.