VIDEO: खेळाडूनं शरीराच्या 'त्या' भागामुळे गमावलं ऑलिम्पिक मेडल; लोकांना शब्दच सुचेना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 01:51 PM2024-08-04T13:51:36+5:302024-08-04T13:56:57+5:30
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रान्सच्या खेळाडूसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Paris Olympics 2024 : यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेच आयोजन फ्रान्सच्या पॅरिसमध्ये करण्यात आलं आहे. ऑलिम्पिकमध्ये जगभरातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ऑलिम्पिकमध्ये विविध स्पर्धांसोबत अनेक धक्कादायक गोष्टीही घडत आहेत. या गोष्टींची जगभरात चर्चा सुरु आहे. असाच काहीसा धक्कादायक प्रकार फ्रान्सच्या खेळाडूसोबत घडला आहे. फ्रान्समधल्या या खेळाडूच्या एका चुकीमुळे त्याचे ऑलिम्पिक पदक हुकलं आहे. या खेळाडूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
फ्रेंच पोल व्हॉल्टर अँथनी अमिराती या खेळाडूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. मात्र तो व्हायरल होण्यामागचं कारण वेगळं आहे. शनिवारी स्टेड डी फ्रान्स येथे खचाखच भरलेल्या देशातील लोकांसमोर अँथनी पुरुषांच्या पोल व्हॉल्टच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. याचे कारण काही इंचाचे होतं. या खेळात दोन यशस्वी प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्यावेळी अँथनीच्या शरीराचा असा भाग तिथल्या मोजमाप करणाऱ्या पट्टीवर आदळला ज्याची कोणी कल्पनाच केली नसले. त्यामुळे अँथनीला अंतिम फेरी गाठता आली नाही.
शनिवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्समधील पोल व्हॉल्ट पात्रता फेरीला सुरुवात झाली. त्यावेळी फ्रान्सच्या अँथनी अमिरातने पहिल्याच प्रयत्नात ५.४० मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ५.६० मीटर उडी मारली. मात्र तिसऱ्यावेळी तो ५.७० मीटर साफ करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे तो पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर फेकला गेला आणि अंतिम फेरी गाठण्यात तो अयशस्वी ठरला.
५.७० मीटर अंतर पार करण्याच्या तिसऱ्या प्रयत्नादरम्यान अँथनीच्या गुप्तांगाचा भाग बारला आदळल्याने तो अयशस्वी ठरवला गेला. हा प्रसंग लोकांना सांगताना समालोचन करणाऱ्यांना शब्द आठवत नव्हते. अँथनी खाली पडल्यानंतर मैदानात एक विचित्र शांतता निर्माण झाली होती. मात्र, हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
He won and lost at the same time 😂 pic.twitter.com/JUkzuWYdfc
— Dudes Posting Their W’s (@DudespostingWs) August 3, 2024
या सगळ्या प्रकारावर अँथनी अमिरातीने भाष्य केलं. “मी लोकांना हसवू आणि हसवू शकलो याचा मला आनंद आहे आणि कोणास ठाऊक, कदाचित ही काहीतरी आश्चर्यकारक सुरुवात असेल,” असं अँथनीने म्हटलं आहे.
दरम्यान, पोल व्हॉल्ट पात्रता स्पर्धेत स्वीडनच्या मोंडो डुप्लंटिसने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ५.७५ मीटर अंतर पार करून अव्वल स्थान पटकावले. नॉर्वेच्या गुट्टोर्मसेन सोंद्रेने दुसरे तर ग्रीसच्या करालिस इमॅनौलीने तिसरे स्थान पटकावले. मात्र कोणत्याही खेळाडूने ५.८० मीटरचा प्रयत्न केला नाही.