Paris Olympics 2024 : भारताची ६ पदकं केवळ एका पावलावर राहिली; पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 07:05 PM2024-08-12T19:05:44+5:302024-08-12T19:06:07+5:30

भारताने ५ कांस्य पदक आणि एका रौप्य पदकासह एकूण सहा पदक जिंकली.

  Paris Olympics 2024 India finished at 71st position in medal table with 6 medals  | Paris Olympics 2024 : भारताची ६ पदकं केवळ एका पावलावर राहिली; पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर?

Paris Olympics 2024 : भारताची ६ पदकं केवळ एका पावलावर राहिली; पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर?

Paris Olympics 2024 news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. तिरंदाजीत तर भारताने खूपच निराशाजनक कामगिरी केल्याने त्या प्रकारात एकही पदक जिंकता आले नाही. अखेर भारताने ५ कांस्य पदक आणि एका रौप्य पदकासह एकूण सहा पदक जिंकली. विनेश फोगाट अपात्र ठरल्याने हक्काचे पदकही गेले. त्यावर अद्याप ठोस निर्णय आलेला नाही. विशेष बाब म्हणजे सहा ठिकाणी भारत चौथ्या स्थानी राहिल्याने पदकापासून केवळ एक पाऊल दूर राहिला. नीरज चोप्राच्या रूपात भारताला एकमेव का होईना सुवर्ण पदक मिळेल अशी आशा होती. पण, त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. नेमबाज मनू भाकरने सर्वाधिक २ पदके जिंकण्याची किमया साधली. 

आपल्या शेजारील देश पाकिस्तानने केवळ एक पदक जिंकले असले तरी ते पदकतालिकेत आपल्या पुढे आहेत. पाकिस्तान एका सुवर्ण पदकासह ६२व्या स्थानी आहे, तर भारत ७१व्या स्थानावर आहे. अर्जुन बबुता, मनू भाकर, तिरंदाजी संघ, स्केट संघ, लक्ष्य सेन आणि मिराबाई चानू या शिलेदारांना चौथ्या स्थानावर राहावे लागले. त्यामुळे भारत पदकापासून केवळ एक पाऊल दूर राहिला. ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणे अत्यंत निराशाजनक मानले जाते. कारण इथेच खेळाडूच्या तोंडचा घास हिरावला जातो. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

Web Title:   Paris Olympics 2024 India finished at 71st position in medal table with 6 medals 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.