Paris Olympics 2024 : भारत हॉकीत गोल्ड कसं जिंकणार? कोण कोणाशी भिडणार? रविवारी ठरणार भवितव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 03:57 PM2024-08-03T15:57:46+5:302024-08-03T15:58:17+5:30
india hockey olympics 2024 : भारताच्या हॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली.
india hockey olympics : भारताच्याहॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाने तब्बल ५२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा ऑलिम्पिकमध्ये पराभव केला. शेवटच्या वेळी भारताने १९७२ मध्ये कांगारूंना या व्यासपीठावर पराभूत केले होते. भारताने आतापर्यंत तीन विजय मिळवले आहेत, बेल्जियमविरूद्धचा पराभव वगळता विजयरथ कायम आहे. बेल्जियमने टीम इंडियाचा १-२ असा पराभव केला. भारताने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडचा पराभव केला आहे. तर अर्जेंटिनाविरूद्धचा सामना अनिर्णित संपला.
भारतीय संघाचा फॉर्म पाहता सुवर्ण पदकाच्या आशा जिवंत आहेत. कर्णधार हरमनप्रीत सिंगनेही सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास व्यक्त केला. भारताचा पुढील सामना रविवारी ग्रेट ब्रिटनसोबत होणार आहे. हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत, ४ ऑगस्ट रोजी जर्मनी विरुद्ध अर्जेंटिना, भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम विरुद्ध स्पेन असे सामने होणार आहेत. इथे भारतीय संघ ग्रेट ब्रिटनचा पराभव करण्यात यशस्वी झाला तर उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. भारताने उपांत्य फेरी गाठल्यास उपांत्य फेरीत त्यांचा सामना जर्मनी किंवा अर्जेंटिनाशी होऊ शकतो. उपांत्य फेरीचे सामने ६ ऑगस्टला होणार आहेत, तर सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने ८ ऑगस्टला होणार आहेत.
भारताला काय करावे लागेल?
भारताला रविवारी होणाऱ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनविरूद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. असे झाल्यास टीम इंडिया उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या क्वार्टर फायनलमधील विजेत्या संघाविरूद्ध खेळेल. अर्जेंटिना आणि जर्मनी यांच्यातील विजयी संघासोबत भारताची लढत होईल.
सुवर्ण पदकाचा रोडमॅप
क्लार्टर फायनल
- जर्मनी विरूद्ध अर्जेंटिना
- भारत विरूद्ध ग्रेट ब्रिटेन
- नेदरलँड्स विरूद्ध ऑस्ट्रेलिया
- बेल्जियम विरूद्ध स्पेन
सेमी फायनल
क्वार्टर फायनल १ मधील विजयी संघ विरूद्ध २ मधील विजयी संघ
क्वार्टर फायनल ३ मधील विजयी संघ विरूद्ध ४ मधील विजयी संघ
सुवर्ण पदकासाठी लढत
सेमी फायनल १ मधील विजयी संघ विरूद्ध २ मधील विजयी संघ
कांस्य पदकासाठी लढत
सेमी फायनल १ मधील पराभूत संघ विरूद्ध २ मधील पराभूत संघ