पुन्हा सुवर्णभाला फेकण्यास नीरज चोप्रा सज्ज; तंदुरुस्ती राखण्यासोबतच अनेक दिग्गजांचेही आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:34 PM2024-08-06T12:34:55+5:302024-08-06T12:35:25+5:30

गेल्या काही काळापासून दुखापतींचा ससेमिरा नीरजच्या मागे लागला आहे. आज, मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडणार आहे.

paris olympics 2024 Neeraj Chopra ready to throw gold javelin again; Along with maintaining fitness, the challenge of many veterans | पुन्हा सुवर्णभाला फेकण्यास नीरज चोप्रा सज्ज; तंदुरुस्ती राखण्यासोबतच अनेक दिग्गजांचेही आव्हान

पुन्हा सुवर्णभाला फेकण्यास नीरज चोप्रा सज्ज; तंदुरुस्ती राखण्यासोबतच अनेक दिग्गजांचेही आव्हान

पॅरिस भारतीय अॅथलेटिक्स विश्वाला सोनेरी दिवसांची अनुभूती देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा नवे कीर्तिमान रचण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याबरोबरच १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे यावेळी नीरजच्या खांद्यावर असेल. तसेच त्याच्यासमोरचे आव्हान काहीसे कठीण असल्याचे बोलले जात आहे. कारण गेल्या काही काळापासून दुखापतींचा ससेमिरा नीरजच्या मागे लागला आहे. आज, मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडणार आहे.

• दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने ८८.३६ मीटर भाला फेकला होता.

• त्यानंतर खापतीमुळे ओस्ट्राव्हा येथील गोल्डन स्पाईक स्पर्धेत तो सहभागी झाला नाही.

• जूनमध्ये फिनलँडला झालेल्या पावो नुरमी स्पर्धेमध्ये ८५.९७ मीटर भाला फेकत नीरजने सुवर्णपदक पटकावले.

• पुन्हा दुखापतीमुळे ७ जुलैला झालेल्या पॅरिस डायमंड लीगमधून त्याने माघार घेतली.

यामध्ये पात्र ठरलेले खेळाडू ८ ऑगस्टला पदकासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील. नीरज पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो अशी कामगिरी करणारा पाचवा भालाफेकपटू ठरेल. सोबत वैयक्तिक प्रकारात दोन सुवर्णपदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा पराक्रमही नीरज करू शकतो. यावर्षी भारताचा हा गोल्डन बॉय केवळ तीन स्पर्धांमध्ये सहभागी झाला होता. मात्र, या स्पर्धांमध्ये त्याचे प्रतिस्पर्धी लौकिकास साजेशी कामगिरी करू शकले नव्हते.

नीरजपुढे तगडे आव्हान

टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकचा याकूब वाल्वाडेज, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि माजी विश्व चॅम्पियन ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स हे खेळाडू प्रामुख्याने नीरजसमोर तगडे आव्हान उभे करू शकतात. भारताच्या किशोर जेनानेसुद्धा आशियाई खेळांमध्ये ८७.५४ मीटर भाला फेकला होता. त्यामुळे त्याच्याकडून पण अपेक्षा असतील.

ऑलिम्पिकच्या इतिहासात सलग दोन सुवर्णपदके जिंकणारे भालाफेकपटू

एरिक लेमिंग, स्वीडन (१९०८, १९१२)

जोन्नी मायरा, फिनलँड (१९२०, १९२४)

जान जेलेंजी, झेक प्रजासत्ताक (१९९२, १९९६)

आंद्रीयास टी, नॉर्वे (२००४, २००८)

किरण पहल सातव्या स्थानी

अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आपल्या हिटमध्ये भारताची किरण पहल सातव्या स्थानी राहिली. आता उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी तिला रेपेचेजमध्ये भाग घ्यावा लागणार आहे. आपला २४ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या किरणने ५२.५१ सेकंदांची वेळ नोंदवली होती. तिच्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीपेक्षा (५०.९२) ती बरीच मागे राहिली. प्रत्येक हिटमधील अव्वल तीन खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

Web Title: paris olympics 2024 Neeraj Chopra ready to throw gold javelin again; Along with maintaining fitness, the challenge of many veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.