Paris Olympics 2024 : एक फोटो अन् लाईक्सचा वर्षाव; काही तासातच कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:12 PM2024-07-31T18:12:18+5:302024-07-31T18:12:25+5:30
सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे.
Paris Olympics 2024 Viral Photo : पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमुळे संपूर्ण जगात क्रीडामय वातावरण आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची लोकप्रियता वाढत चालली आहे. भारताने आतापर्यंत दोन कांस्य पदके जिंकण्यात यश मिळवले. मनू भाकरने रविवारी आणि मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने मंगळवारी कांस्य पदकाची कमाई केली. सोशल मीडियावरही सर्वाधिक ऑलिम्पिकची चर्चा होत आहे. अशातच सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या सर्फिंग फेरी ३ दरम्यानचा हा फोटो ब्राझिलियन सर्फर ग्रॅबिएल मेडिनाचा आहे.
सर्वांचे लक्ष वेधणारा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर जेरोम ब्रायलेटने काढला आहे. त्याने मेडिनाला हवेत असलेल्या अवस्थेत कॅप्चर केले. जेरोम ब्रायलेटने या फोटोमागील कारण सांगितले आहे. तो म्हणाला की, मेडिना उजव्या हाताना आकाशाकडे इशारा करत असताना हा फोटो खेचण्यात आला. लाटा खूप उंच होत्या, अशा परिस्थितीत फोटो काढणे अवघड असते. पण, या परिस्थितीचे संधीत रूपांतर करून चार फोटो काढले, त्यातीलच एक अप्रतिम फोटो हा आहे.
सर्फर ग्रॅबिएल मेडिनाने फोटो पोस्ट करताच लाईक्सचा वर्षाव झाला. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोला ६० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मेडिना एखाद्या चित्रपटातील सीनमधील दृश्याप्रमाणे दिसत आहे. तो हवेत उडत असल्याचे फोटो पाहून जाणवते. फोटोग्राफर ब्राझिलियनने आणखीही काही फोटो शेअर केले आहेत. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी फोटोग्राफरचे कौतुक केले.
दरम्यान, ग्रॅबिएल मेडिनाने एकूण चार फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो सर्वांना आकर्षित करणारा आहे. तर इतर फोटोंमध्ये तो लाटांवर स्टंटबाजी करताना दिसतो आहे. पण, ज्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले तो फोटो अनोखा असल्याने सर्वांनाच याची भुरळ पडत आहे.