ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राला अनेक दिवसांपासून हर्नियाचा त्रास; लवकरच होणार सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 09:36 PM2024-08-09T21:36:36+5:302024-08-09T21:37:23+5:30
Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिकनंतर आता नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला जाणार आहे.
Neeraj Chopra Surgery : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदकावर आपले नाव कोरले. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर भाला फेकला, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, आता नीरजशी संबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे. नीरजला अनेक दिवसांपासून हर्नियाचा त्रास आहे. लवकरच त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हर्नियामुळे अनेक दिवसांपासून नीरजला कंबरेत वेदना होत आहेत. आता लवकरच त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत नीरजने फार कमी स्पर्धा खेळल्या, त्यामागे हर्नियाचे कारण मानले जात आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरजकडे विश्रांतीसाठी वेळ असल्यामुळे त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते.
नीरजचा कोचिंग स्टाफ बदलणार
दरम्यान, नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफशी संबंधितही एक मोठी माहिती समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकूनही नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल होणार आहे. नीरज चोप्राचे सध्याचे प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिट्झ आता त्याच्यासोबत राहणार नाहीत. क्लॉस बार्टोनिट्झ गेल्या सहा वर्षांपासून नीरजला प्रशिक्षण द्यायचे. पण, आता नीरजला आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल हवाय.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावे 5 पदके
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत 5 पदकांवर आपले नाव कोरले आहे. यात 4 कांस्य आणि 1 रौप्यपदक आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर शुटिंगमध्ये पहिले कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. त्यानंतर हॉकी संघानेही कांस्यपदकाची कामगिरी केली. शेवटी नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.