पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमची दहशतवादी नेता हारिस डारने घेतली भेट, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 07:33 PM2024-08-13T19:33:36+5:302024-08-13T19:36:19+5:30
Arshad Nadeem News: पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर भारतातूनही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. मात्र आता अर्शद नदीमचा एक असा फोटो व्हायरल झाला आहे जो पाहून त्याचं कौतुक करणाऱ्या असंख्य भारतीयांना धक्का बसू शकतो.
नुकत्याच पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते. याच क्रीडाप्रकारात भारताच्या नीरज चोप्रा याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, नीरज चोप्राच्या आईने अर्शद नदीम हा सुद्धा आपल्यासाठी मुलासारखा असल्याचं विधान केलं होतं. या विधानानंतर नीरजच्या आईचं खूप कौतुक झालं होतं. तसेच काही भारतीयांनीसुद्धा अर्शद नदीमचं कौतुक केलं होतं. मात्र आता अर्शद नदीमचा एक असा फोटो व्हायरल झाला आहे जो पाहून त्याचं कौतुक करणाऱ्या असंख्य भारतीयांना धक्का बसू शकतो. या फोटोमध्ये अर्शद नदीम हा लष्कर एक तोयबा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेचा नेता हारिस डार याची भेट घेताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अर्शद नदीम हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित हारिस डार याची भेट घेताना दिसत आहे. हारिस डार हा मिल्ली मुस्लिम लीग या पक्षाचा संयुक्त सचिव आहे. मिल्ली मुस्लिम लीग हा पक्ष मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या हाफिझ सईदच्या जमात उल दावा या संघटनेची राजकीय संघटना आहे. एकप्रकारे ही संघटना जमात उल दावाचा राजकीय मुखवटा म्हणून काम करते.
अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाने २०१८ मध्ये हारिस डारसह ७ नेत्यांचा दहशतवाद्यांच्या श्रेणीमध्ये समावेश केला होता. तसेच त्यांच्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. हारिस डार एमएमएल लष्कराच्या विद्यार्थी संघटनेचा नेताही राहिलेला आहे. दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यापासून भारतात खळबळ उडाली आहे. तसेच अर्शद नदिमचं कौतुक करणारेही त्याच्यावर टीका करू लागले आहेत. मात्र हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.