आखाड्याबाहेरील कुस्ती! विनेश फोगाटला न्याय द्या, भारतरत्न देऊन सन्मानित करा; खाप पंचायती मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:37 PM2024-08-12T13:37:54+5:302024-08-12T13:38:14+5:30

विनेश फोगाटसाठी खाप पंचायती मैदानात उतरल्या आहेत. 

paris olympics 2024 Sombir Sangwan Khap Panchayat chief over wrestler Vinesh Phogat's disqualification from the final event of the Olympics | आखाड्याबाहेरील कुस्ती! विनेश फोगाटला न्याय द्या, भारतरत्न देऊन सन्मानित करा; खाप पंचायती मैदानात

आखाड्याबाहेरील कुस्ती! विनेश फोगाटला न्याय द्या, भारतरत्न देऊन सन्मानित करा; खाप पंचायती मैदानात

vinesh phogat news : भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित ठरवल्याने भारताचे हक्काचे पदक गेले. ती फायनलमध्ये पोहोचल्याने एक पदक निश्चित झाले होते. पण, अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन वाढल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. याचा निषेध म्हणून रविवारी हरयाणातील खाप पंचायती एकवटल्या. त्यांनी विविध मागण्या करत विनेशला न्याय देण्याची मागणी केली. तसेच विनेश फोगाटचा सर्वोच्च पुरस्कार अर्थात भारतरत्न देऊन सन्मान करा अशीही मागणी त्यांनी केली. फायनलपूर्वी विनेशचे १०० ग्रॅम वजन वाढल्याने तिला पदकापासून दूर राहावे लागले. अशातच विनेशने कुस्तीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. खाप पंचायतींनी विनेशला कुस्तीतून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करून विनेश फोगाटला न्याय मिळावा, असे सांगवान खापचे प्रमुख सोमबीर सांगवान यांनी नमूद केले. तसेच त्यांनी शंका उपस्थित करताना, अचानक वजन कसे वाढले? तिच्यासोबत अनेक लोक होते आणि तिचे वजन वाढू नये याची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी होती, त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खापच्या मागण्यांचा पाढा वाचताना सांगवान यांनी विनेशच्या कामगिरीचा विचार करून तिला भारतरत्नने सन्मानित केले जावे, अशी मागणी केली.

सोमबीर सांगवान पुढे म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूला ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा विनेशला मिळायल्या हव्यात. ती त्यासाठी पात्र आहे. विनेशने तिची निवृत्ती परत घेऊन कुस्ती सुरू ठेवण्याचे आवाहन मी करतो. तिला आगामी काळात राजकारणात जायचे का हे सर्वकाही तिच्यावर अवलंबून आहे.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

Web Title: paris olympics 2024 Sombir Sangwan Khap Panchayat chief over wrestler Vinesh Phogat's disqualification from the final event of the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.