Paris Olympics 2024 Updates : पुरेपूर कोल्हापूर! १९५२ नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या लेकाला ऑलिम्पिक पदक; दोघंही पराक्रमी वीर 'करवीर'चे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 02:29 PM2024-08-01T14:29:41+5:302024-08-01T14:35:24+5:30
Paris Olympics 2024 Updates : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कास्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पहिल्यांदाच पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. या पदकावर नाव कोरुन स्वप्नीलने मोठा इतिहास रचला आहे. या आधी महाराष्ट्राला वैयक्तिक पदक १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांच्या रुपाने मिळाले होते. खाशाबा जाधवही कोल्हापुरचे होते, आता १९५२ नंतर पुन्हा एकदा वैयक्तिक पदक मिळवणारा खेळाडू कोल्हापुरचाच आहे. स्वप्नील कुसाळे यांनी कालच जोरदार खेळी केली होती, आज अंतिम फेरीतही चमकदार कामगिरी करत अखेर कोल्हापुरकरांचं स्वप्न साकार केलं.
काल स्वप्नीलने जोरदार खेळी केली होती. ही बातमी वाऱ्यासारखी कोल्हापुरात पसरली होती. यावेळीच स्वप्नील खाशाबा जाधवानंतर कोल्हापुरला पदक मिळवून अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज स्वप्नीलने असंख्य कोल्हापुरकरांची स्वप्न पूर्ण केली आहेत.
अशी केली खेळी
अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. फायनलमध्ये सुरुवातीला स्वप्नील सहाव्या स्थानी होता. (swapnil kusale kolhapur) अंतिम फेरीत एकूण आठ स्पर्धक होते. (swapnil kusale shooting) प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट्सची संधी होती. हे शॉट्स पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी गुण असलेले दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. नंतर प्रत्येक एका शॉटनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित होईपर्यंत प्रत्येक १-१ खेळाडू बाहेर होत गेला.Kneeling ची अर्थात पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत स्वप्नील पाचव्या स्थानावर होता. आता स्टँडिंग शॉट्स पदकांचे चित्र स्पष्ट करणारे होते. यात स्वप्नीलने चमकदार कामगिरी करत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. या राऊंडच्या अखेरपर्यंत यूक्रेनचा खेळाडू अव्वल तर चीनचा दुसऱ्या आणि भारताचा स्वप्नील तिसऱ्या स्थानावर राहिला. या घडीला पाच स्पर्धक स्पर्धेत जिवंत होते. पण यातील एक खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्याने स्वप्नीलचे पदक पक्के झाले.
असाही योगायोग
ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून फक्त खाशाबा जाधव याना यश आले आहे. हेलसिंकी १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू बनण्याची संधी स्वप्नीलने मिळवली आहे. स्वपीलने जोरदार कामगिरी करत कास्यपदकावर आपले नाव कोरले आहे.