Paris Olympics 2024 : हे यश सर्वांचे! २ कांस्य जिंकल्यानंतर मनूची लांबलचक पोस्ट, आभार मानताना भारावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 06:51 PM2024-08-03T18:51:46+5:302024-08-03T18:59:29+5:30
Manu Bhaker Latest News : मनू भाकरची पदकाची हॅटट्रिक हुकली.
Paris Olympics 2024 Updates In Marathi | पॅरिस : मनू भाकर पदकाची हॅटट्रिक मारून आणखी एक पदक जिंकेल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, अंतिम सामन्यात मनूला अपयश आले अन् तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. २२ वर्षीय मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने आज पुन्हा एकदा अंतिम फेरी खेळली. या आधी तिने दोन कांस्य पदकांना गवसणी घातली होती. त्यात भर पडणार का, याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. फायनलमध्ये बऱ्यापैकी युवा खेळाडू होते. पण, अखेरच्या क्षणी मनू भाकरपासून पदक एक पाऊल दूर राहिले. कोरियाची खेळाडू पहिल्या क्रमांकावर कायम होती. मनूने सातत्याने चांगले शॉट्स खेळल्याने तिने आणखी एक पदक निश्चित केले असे सर्वांना वाटू लागले. अखेरचे तीन शॉट्स राहिले असताना सामन्यात रंगत आली. मनूने पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, कोरियन खेळाडू वरचढ ठरल्याने मनूला अखेर पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले अन् ती चौथ्या क्रमांकावर राहिली.
मनू भाकरने पोस्टच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले. ती म्हणाली की, मला मिळत असलेला तुमचा पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे मी खूप भारावून गेली आहे. २ कांस्य पदके जिंकणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. हे यश फक्त माझे नाही तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि मला या मार्गात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आहे. माझे कुटुंब, प्रशिक्षक जसपाल राणा सर आणि NRAI, TOPS, SAI, OGQ, Performax आणि खासकरून हरयाणा सरकारसह माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या प्रत्येकाच्या पाठिंब्याशिवाय मी हे करू शकले नसते. ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर कामगिरी करणे हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.
तसेच या अतुलनीय प्रवासात सहभागी झाल्याबद्दल आणि प्रत्येक पायरीवर माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. तुमचे प्रोत्साहन म्हणजे माझ्यासाठी जणू काही जगच... पॅरिसमधील माझ्या मोहिमेचा शेवट कडू आणि गोड झाला. पण टीम इंडियाच्या यशात योगदान दिल्याबद्दल खूप आनंद झाला. जय हिंद, अशा शब्दांत मनू भाकरने सर्वांचे आभार मानले.
I am extremely overwhelmed by the support and wishes that have been coming in. Winning 2 bronze medals is a dream come true. This achievement is not just mine but belongs to everyone who has believed in me and supported me along the way. I couldn't have done it without the… pic.twitter.com/ZNrXz3D5Jg
— Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) August 3, 2024
मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी
- २८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
- ३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.
- ३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.