Paris Olympics 2024 : नीरज चोप्राच्या मातेला शोएब अख्तरचा सलाम; त्या माऊलीचे शब्द ऐकून भारावला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 01:27 PM2024-08-09T13:27:16+5:302024-08-09T13:28:00+5:30
paris olympics 2024 updates in marathi : भारताने ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत.
neeraj chopra match olympic 2024 : ऑलिम्पिक २०२४ च्या भालाफेक प्रकाराच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऐतिहासिक भाला फेकून सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, गोल्डन बॉय नीरज चोप्रा काही चमत्कार करेल या आशेने तमाम भारतीय त्याला पाहत होते. अखेर पाकिस्तानने सुवर्ण तर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शदने ऐतिहासिक कामगिरी करताना तब्बल ९२.९७ मीटर भाला फेकला. त्याने यासह ऑलिम्पिकमध्ये सर्वात दूर भाला फेकण्याचा विश्वविक्रम केला. भारताचा स्टार नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम टोकियो ऑलिम्पिकमध्येही अंतिम फेरीत पोहोचले होते. तेव्हा मात्र पाकिस्तानच्या अर्शदला पदकाला मुकावे लागले होते. यावेळी मात्र त्याने थेट सुवर्ण पदक पटकावले. नीरज चोप्राची आई सरोज देवी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना एक विधान केले, ज्याची पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला भुरळ पडली. आम्ही खूपच आनंदी आहोत, आमच्यासाठी रौप्य पदक हे सुवर्ण पदकासमानच आहे. ज्याने सुवर्ण पदक जिंकले, तोही आमचाच मुलगा आहे. त्याने खूप मेहनत करून ते जिंकले आहे. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. नीरज जखमी झाला होता. त्यामुळे आम्ही त्याच्या कामगिरीवर खूश आहोत. जेव्हा नीरज घरी येईल तेव्हा त्याच्या आवडीचे जेवण बनवणार आहे, असे नीरजच्या आईने सांगितले.
"Gold jis ka hai, wo bhi hamara he larka hai".
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) August 9, 2024
Yeh baat sirf aik maa he keh sakti hai. Amazing.
शोएब अख्तरने नीरज चोप्राच्या आईच्या विधानाचा दाखला देत सोशल मीडियावर एक पोस्ट केली. तो म्हणाला की, "सुवर्ण पदक ज्याचे आहे, तो देखील आमचाच आहे", हे केवळ एक आईच म्हणू शकते. अद्भुत. एकूणच अख्तरने नीरजच्या आईच्या विधानाचे कौतुक करताना त्याला दाद दिली.
पाकिस्ताननं फक्त एक पदक जिंकलं अन् भारताला मागं टाकलं; पदकतालिकेत मोठी झेप घेतली
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. गुरुवारी भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची नोंद झाली. भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली.