पाकिस्ताननं फक्त एक पदक जिंकलं अन् भारताला मागं टाकलं; पदकतालिकेत मोठी झेप घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:46 PM2024-08-09T12:46:11+5:302024-08-09T12:48:55+5:30
paris olympics 2024 updates in marathi : भारताने ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत.
paris olympics 2024 medal tally : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. गुरुवारी रात्री भारत आणि पाकिस्तान या दोन्हीही देशातील तमाम नागरिकांच्या नजरा आपल्या भालाफेकपटूंकडे लागल्या होत्या. भारताचा नीरज चोप्रा तर पाकिस्तानचा अर्शद नदीम मैदानात होता. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासमोर पदकाचा बचाव करण्याचे मोठे आव्हान होते. पण, पाकिस्तानच्या अर्शदने ऐतिहासिक कामगिरी करताना तब्बल ९२.९७ मीटर भाला फेकला. त्याने यासह ऑलिम्पिकमध्ये सर्वात दूर भाला फेकण्याचा विश्वविक्रम केला. भारताचा स्टार नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
अर्शद नदीमने सर्वात दूर भाला फेकून आपल्या देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले. शेजाऱ्यांना तब्बल ३२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमधून पदक मिळाले. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये केवळ एक पदक जिंकले असले तरी ते पदकतालिकेत भारताच्या पुढे आहेत. भारताने चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. मात्र, भारत एकही सुवर्ण पदक जिंकू न शकल्याने पदकतालिकेत आताच्या घडीला ६४व्या स्थानी आहे, तर पाकिस्तान एका सुवर्ण पदकासह ५३व्या क्रमांकावर पोहोचला.
अमेरिकेचा दबदबा
दरम्यान, अमेरिकेने आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. त्यांनी ३० सुवर्ण, ३८ रौप्य आणि ३५ कांस्य पदकांसह एकूण १०३ पदकांना गवसणी घातली. तर ७३ पदकांसह चीन दुसऱ्या आणि ४५ पदकांसह ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. गुरुवारी भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची नोंद झाली. भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली.