सोनेरी डाव टाकण्याआधी घात! 53 किलो सोडून विनेश फोगाटनं 50 किलो वजनी गटातून का ठोकला शड्डू?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:07 PM2024-08-07T16:07:50+5:302024-08-07T16:16:28+5:30
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विनेश फोगाट हिने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी खूपच कसरत केली होती. तिची ही मेहनत फळाला येणार, असे दिसत असताना तोंडचा घास गमावण्याची वेळ तिच्यावर आली.
जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाटनं भारताची मान उंचावणारी कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्यातून भारतासाठी पदक निश्चित झाले होते. पण फायनलआधी डावच उलटा पडला. कुस्ती चाहत्यांसह विनेश फोगाटला अंतिम लढती आधी मोठा धक्का बसला. अधिक वजन असल्याच्या कारणामुळे महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला 50 किलो वजनी गटातून अपात्र ठरवण्यात आले. अंतिम सामन्यात प्रवेश केल्यावर अपात्र ठरणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
वजनामुळे सत्यात उतरलेलं स्वप्न वजनामुळेच भंगलं
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विनेश फोगाट हिने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी खूपच कसरत केली होती. तिची ही मेहनत फळाला येणार, असे दिसत असताना तोंडचा घास गमावण्याची वेळ तिच्यावर आली. आखाड्यात ती सुवर्ण डाव खेळेल, असेच वाटत होते. पण अगदी काही प्रमाणात वाढलेल्या वजनामुळे घात झाला. जे स्वप्न सत्यात अवतरलं होते ते खोटं ठरताना दिसतं आहे.
सोनेरी डाव खेळण्याच्या तयारीत असताना ठरली अपात्र
अंतिम सामन्यात पोहचेपर्यंत वजन नियंत्रित ठेवणाऱ्या विनेश फोगाटच्या आहारात नेमका काय बदलं झाला अन् तिच वजन नेमकं किती वाढलं? सोनेरी डाव खेळण्याच्या तयारीत असताना तिला अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य आहे का? असे अनेक प्रश्न आता चर्चेत येत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बहुतांशवेळा 53 किलो वजनी गटातून आखाड्यात शड्डू ठोकणारी विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात का खेळली. जर ती नियमित ज्या 53 गटातून खेळते त्या गटातून उतरली असती तर ही वेळच आलीच नसती का? हे प्रश्नही अगदी विचार करायला भाग पाडणारे आहेत.
48 ते 50 किलो वजनी गटात अनेक पदकं, पण
विनेश फोगाट हिने 48 ते 50 किलो वजनी गटात अनेक पदके मिळवली आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून ती 53 किलो वजनी गटात खेळताना पाहायला मिळाले होते. 2020 मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 53 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली होती. याआधी 2019 मध्ये जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतही तिने याच वजनी गटात कांस्य पदक कमावले होते. पण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 53 किलो वजनी गटातून अंतिम पंघाल हिने कोटा निश्चित केला. परिणामी विनेश फोगाट हिने वजन कमी करण्याची कसरत करत 50 किलो वजनी गटातून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एन्ट्री मारली होती.
50 किलो वजनी गट अन् विनेश फोगाटचा सोनेरी डाव
2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 50 किलो वजनी गटात विनेश फोगाट हिेन सुवर्ण कामगिरी नोंदवली होती. याशिवाय 2014 मध्ये ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील तिने सुवर्ण पदक कमावले होते.