रक्त काढलं, केस-नखं कापली अन्...; फायनलच्या आदल्या रात्री विनेश फोगटसोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:03 PM2024-08-07T14:03:09+5:302024-08-07T14:08:49+5:30
अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलं आहे.
Vinesh Phogat Disqualified: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणि कुस्तीपटूविनेश फोगटसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला ५० किलो गटात सुवर्णपदकाच्या लढतीतून आधीच अपात्र ठरवण्यात आले आहे. ठरवलेल्या निकषांपेक्षा काही ग्रॅम वजन जास्त असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे आता पॅरिस ऑलिम्पिकच्या नियमांनुसार विनेश फोगटही रौप्यपदकासाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे विनेशसह सर्व भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी विनेशने शेवटपर्यंत पर्यत्न केल्याचे समोर आलं आहे.
भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरली आहे. मंगळवारी रात्री ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगटचे वजन मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. मंगळवारी रात्री विनेश फोगटचे वजन दोन किलो जास्त होते आणि तिने ते कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. विनेशने सेमीफायनल मॅच जिंकली तेव्हा तिचे वजन सुमारे ५२ किलो होते. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी वजन दोन किलोने कमी करण्यासाठी तिने विश्रांती न घेता व्यायाम सुरु केला होता.
अंतिम फेरीआधी केलेल्या वजनात विनेशचे वजन ५२ किलो होतं. त्यामुळे अंतिम फेरीसाठी वजन कमी करणे महत्त्वाचे होते. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर विनेश फोगटने विश्रांती घेतली नाही. तिने रात्रभर जागून तिचे अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. स्पोर्ट्स स्टारच्या रिपोर्टनुसार, विनेश फोगटने वजन कमी करण्यासाठी सायकल चालवली, स्किपिंग केले. एवढेच नाही तर तिने आपले केस आणि नखंही कापली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनेशने तिचे रक्तही काढले होते.
एवढे सगळे प्रयत्न करुनही ती केवळ ५० किलो १५० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकली. त्यानंतर विनेशच्या टीमने आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या वतीनंही तिला १०० ग्रॅम वजन कमी करण्यासाठी अखेरची संधी देण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र तसे झाले नाही आणि तिला अपात्र ठरवण्यात आलं.
विनेशची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
बेशुद्ध झाल्याने विनेश फोगटला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.