Paris Paralympics 2024 : घर विकून पिस्तूलची खरेदी! मनीषनं देशाचं नाव रोशन करत दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक गाजवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 06:10 PM2024-08-30T18:10:50+5:302024-08-30T18:17:52+5:30
Paris Paralympics 2024 Day 2 Live : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले.
Manish Narwal wins SILVER for India : पॅरिस पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शिलेदारांनी चमकदार कामगिरी केली. अवनी लेखराने सुवर्ण पदकाचा बचाव करत इतिहास रचला. अवनी लेखरा पाठोपाठ भारताचा आणखी एक स्टार नेमबाज मनीष नरवालने इतिहास रचला आहे. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतासाठी रौप्य पदक जिंकले. सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये पदकावर त्याने निशाणा साधला. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये मनीषने सुवर्ण पदक जिंकले होते. शुक्रवारी अवनी लेखराने सुवर्ण पदक जिंकून भारताच्या पदकाचे खाते उघडले. त्यानंतर मोना अग्रवाल आणि प्रीती पाल यांनी कांस्य पदक जिंकले. आता मनीषने रौप्य पदक जिंकून पदकांचा चौकार मारला.
मनीष नरवालचा जन्म १७ ऑक्टोबर २००१ रोजी झाला. त्याचा उजवा हात लहानपणापासून काम करत नव्हता. कुटुंबीयांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पण मनीषचा हात बरा करण्यात त्यांना यश आले नाही. मनीष कळत्या वयात आल्यानंतर त्याला फुटबॉलची आवड लागली. पण एके दिवशी फुटबॉल खेळत असताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. मात्र त्याला याबाबत काही जाणवले नाही. त्याच दिवशी त्याच्या पालकांनी त्याला फुटबॉल सोडून देण्यास सांगितले. वडिलांच्या एका मित्राच्या विनंतीवरून मनीषने शूटिंग सुरू केले. त्यातही त्याला लगेच रस वाटू लागला. पण आता पिस्तूल घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून वडील दिलबाग यांनी त्यांचे घर सात लाख रुपयांना विकले आणि पिस्तूलची खरेदी केली. याच मुलाने पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी पदके जिंकून आपल्या पालकांचे नाव रोशन केले.
अवनी लेखराला गोल्ड
सुवर्ण पदकासाठी काही वेळ भारताच्या दोन खेळाडूंमध्ये चुरस झाली. मोना अग्रवाल काही वेळ अव्वल स्थानी राहिली. पण यानंतर कोरियन नेमबाजने पहिला क्रमांक पटकावला. मग अवनी तिसऱ्या क्रमांकावर घसरली होती. मात्र, तिने जबरदस्त पुनरागमन केले. भारताच्या मोनाचा प्रवास २२ शॉट्सनंतर तिसऱ्या क्रमांकावर संपला. २४व्या आणि शेवटच्या शॉटमध्ये अवनीने १०.५, तर दक्षिण कोरियाच्या युनरीने ६.८ असा स्कोअर केला. अशा प्रकारे अवनीने सुवर्ण पदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी सुवर्ण पदक जिंकता आले. अवनी लेखरा हिने सोनेरी कामगिरी करत तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल एकेरीत सुवर्ण पदक पटकावले.