पार्थिव, रायडूची दमदार खेळी
By admin | Published: April 26, 2016 05:32 AM2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30
भेदक गोलंदाजीवर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा २५ धावांनी पराभव केला.
मोहाली : पार्थिव पटेल (८१), अंबाती रायुडू (६५) यांची आक्रमक फटकेबाजी आणि नंतर टीम साउदी (२/२८), मिशेल मॅक्लेनघन (२/३२) जसप्रीत बुमराह (३/२६) यांच्या भेदक गोलंदाजीवर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा २५ धावांनी पराभव केला. किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला १९0 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव १६४ धावांत संपुष्टात आला. त्यांच्या शॉन मार्शने ३४ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार मारून ४५ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने ३९ चेंडंूत ५ चौकार व १ षटकार ठोकून ५६ धावांची दमदार खेळी केली. डेव्हीड मिलर १७ चेंडूंत १ चौकार व २ षटकार मारून ३0 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आणि अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १८९ अशी मजल मारली होती. पंजाबच्या संदीप शर्माने मुंबईला पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माला शून्यावर बाद करून झटका दिला. त्यानंतर पार्थिव पटेल व अंबाती रायुडूने यांनी दुसऱ्या गड्यासाठी १४.१ षटकांत १३७ धावांची भागीदारी केली. पार्थिवने ५८ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ८१ धावांचे योगदान दिले. रायुडूने ३७ चेंडंूत प्रत्येकी चार चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने ६५ धावा ठोकल्या. जेम्स बटलरनेदेखील अवघ्या १३ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह २४ धावा व केव्हिन पोलार्डने दहा धावा केल्या होत्या. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक :
मुंबई इंडियन्स : २० षटकात ६ बाद १८९ ( रोहित शर्मा ००, पार्थिव पटेल ८१, अंबाती रायुडू ६५, जेम्स बटलर २४, किरॉन पोलार्ड १०, हार्दिक पंड्या ४, कुणाल पंड्या नाबाद ००, अवांतर : ५; गोलंदाजी : संदीप शर्मा १/२०, मिशेल जॉन्सन १/४३, अक्षर पटेल ४१/१, मोहित शर्मा ३/३८. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकात ७ बाद १६४ (मुरली विजय १९, मनन व्होरा ७, शॉन मार्श ४५,ग्लेन मॅक्सवेल ५६, डेव्डिड मिलर नाबाद ३०, निखिल नायक १, अक्षर पटेल १,,मिचेल जॉनसन १, मोहित शर्मा नाबाद ०; अवांतर : ५; गोलांदाजी :टीम साउदी २/२८, मिशेल मॅक्लेनघन २/३२, जसप्रीत बुमराह ३/२६).