गोळाफेकपटू मनप्रीत डोपमध्ये अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:44 AM2017-07-20T04:44:23+5:302017-07-20T04:44:23+5:30
आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर ही डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नुकतेच भुवनेश्वरमध्ये तिने जिंकलेले सुवर्ण गमविण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर ही डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नुकतेच भुवनेश्वरमध्ये तिने जिंकलेले सुवर्ण गमविण्याची शक्यता आहे.
पतियाळा येथे १ ते ४ जून या कालावधीत पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय चॅम्पियनशिपदरम्यान राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने(नाडा) तिचे नमुने घेतले होते. त्यात प्रतिबंधित स्टिम्युलेंट डायमेथिलबुटिलेमाइन हे द्रव्य आढळून आले. ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह आढळल्यास तिला आशियाई सुवर्ण गमवावे लागणार आहे.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,‘ मनप्रीत जूनमध्ये झालेल्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत पॉझिटिव्ह आढळली होती. तिच्या लघवीच्या नमुन्यात स्टिम्युलेंट डायमेथिलबुटिलेमाइन हे द्रव्य आढळून आले. नाडाकडून काल रात्री आम्हाला ही माहिती मिळाली.’
मनप्रीतचे कोच आणि पती करमजित म्हणाले, ‘आम्हाला या संदर्भात अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा एखादा खेळाडू स्टिम्युलेंट डायमेथिलबुटिलेमाइन सेवनात दोषी आढळला आहे. याआधी २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडू मेथिल हेक्सानामाइन सेवनात दोषी आढळले होते. मनप्रीत लंडनमध्ये पुढील महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली आहे. पण आता तिचा सहभागही धोक्यात आला. (वृत्तसंस्था)
एएफआयचा अधिकारी म्हणाला, ‘याबाबत अद्याप विचार केला नसला तरी जागतिक स्तरावर नाचक्की होऊ नये यासाठी विचार करावा लागेल.
मनप्रीतने चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रॅण्डप्रिक्समध्ये १८.८६ मीटर गोळाफेक करीत विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता सिद्ध केली होती.