पटणा पायरेट्सचा दमदार ‘चौकार’
By admin | Published: February 9, 2016 03:30 AM2016-02-09T03:30:37+5:302016-02-09T03:30:37+5:30
प्रदीप नरवालने केलेल्या निर्णायक सुपर रेडच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवताना पटणा पायरेट्सने प्रो-कबड्डीमध्ये विजयी घोडदौड कायम राखताना तेलगू टायटन्सचे
- रोहित नाईक, कोलकाता
प्रदीप नरवालने केलेल्या निर्णायक सुपर रेडच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवताना पटणा पायरेट्सने प्रो-कबड्डीमध्ये विजयी घोडदौड कायम राखताना तेलगू टायटन्सचे तगडे आव्हान २९-२५ असे परतावले.
नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी एकमेकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करताना बचावात्मक पवित्रा घेतला. पटणाने अपेक्षेप्रमाणे गुणांची कमाई केल्यानंतर तेलगू संघानेही जोरदार प्रत्युत्तर देताना सामना जवळजवळ बरोबरीत राखला होता. मात्र १७व्या मिनिटाला प्रदीपने निर्णायक सुपर रेड करताना तब्बल ४ गडी बाद केले. शिवाय यासह तेलगू संघावर लोणही चढल्याने या एकाच चढाईत पटणाने ६ गुण कमावताना १६-९ अशी मोठी आघाडी घेतली. हीच आघाडी अखेर निर्णायक ठरली.
मध्यंतराला पटणाने १८-११ असे वर्चस्व राखल्यानंतर तेलगू संघाने दुसऱ्या सत्रात आक्रमक पवित्रा घेतला. मात्र प्रयत्न फसल्याने पटणाने २४-१७ अशी मोठी आघाडी घेत सामना आपल्याबाजूने झुकवला. कर्णधार राहुल चौधरी, सुकेश हेगडे यांनी काही अप्रतिम चढाई करताना तेलगूची पिछाडी कमी केली. मात्र संदीप नरवाल, विनोद कुमार यांनी दमदार पकडी करून पटणाच्या विजयावर शिक्का मारला. प्रदीपने पटणाला एकहाती विजय मिळवून देताना ११ गुण मिळवले.
बंगालकडून दिल्ली पराभूत
पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या दबंग दिल्लीला पाचव्या सामन्यातही पराभूत व्हावे लागले. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या यजमान बंगाल वॉरियर्सने आक्रमक खेळाच्या जोरावर दिल्लीला ३४-१७ असे लोळवले.
मध्यंतराला १८-७ अशा आघाडीसह यजमानांनी सामन्याचा निकाल स्पष्ट केल. यानंतर बंगालने आणखी वेगवान खेळ करत दिल्लीला पुनरागमनाची संधीच दिली नाही. सांघिक खेळ केलेल्या बंगालपुढे दिल्लीकरांचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही.