पटना पायरेट्स पहिल्यांदाच ‘चॅम्पियन’

By admin | Published: March 6, 2016 03:16 AM2016-03-06T03:16:01+5:302016-03-06T03:16:01+5:30

अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मोक्याच्या वेळी बाजी मारत पटना पायरेट्सने प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्राचे दिमाखदार विजेतेपद पटकावत गतविजेत्या यू मुंबाला ३१-२८ असे नमवले

Patna pirate's first 'champion' | पटना पायरेट्स पहिल्यांदाच ‘चॅम्पियन’

पटना पायरेट्स पहिल्यांदाच ‘चॅम्पियन’

Next

प्रो कबड्डी : मुंबईकरांचे उपविजेतेपदावर समाधान
रोहित नाईक,  नवी दिल्ली
अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मोक्याच्या वेळी बाजी मारत पटना पायरेट्सने प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्राचे दिमाखदार विजेतेपद पटकावत गतविजेत्या यू मुंबाला ३१-२८ असे नमवले. त्याचवेळी याआधी झालेल्या सामन्या पुणेरी पलटणने स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर कब्जा करताना बंगाल वॉरियर्सचे आव्हान ३१-२७ असे परतावले.
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात सुरुवातीला बचावफळी सपशेल अपयशी ठरल्याचा मोठा फटका मुंबईला बसला. २९व्या मिनिटापर्यंत पटना एका गुणाने आघाडीवर असताना कर्णधार अनुप कुमारने अखेरच्या मिनिटात मुंबईला महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. मात्र, दीपक नरवालने निर्णायक चढाई करताना संघाला २९-२८ असे आघाडीवर नेल्यानंतर अनुप चढाई करताना मैदानाबाहेर गेला आणि नंतर संदीप नरवालने जीवा कुमारला बाद करून पटनाच्या पहिल्या वहिल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करताना सामन्याची रंगत वाढवली. ५व्या मिनिटापासून पटनाने वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. यू मुंबाच्या चुकांचा फायदा घेत पटनाने जबरदस्त पकड मिळवली. ७व्याच मिनिटाला मुंबईवर लोण चढवून पटनाने १०-२ अशी मजबूत आघाडी घेतली. मुंबईकरांच्या पकडी सपशेल अपयशी ठरत होत्या. पकडीमध्ये पहिला गुण मिळवण्यासाठी मुंबईला तब्बल १५व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली. या वेळी मोहित चिल्लरने पहिली यशस्वी पकड केली. मात्र, तरीही मुंबईकर ८ गुणांनी पिछाडीवर होते.
मुंबईकर पुनरागमन करणार, असे वाटत असतानाच रोहित कुमारने सुपर रेडसह पटनाची स्थिती आणखी मजबूत केली. पुन्हा एकदा मुंबईवर लोणचे संकट असताना मोहित चिल्लरने बदली खेळाडू सुरेंदर नाडासह सुपर टॅकल केली. तरीही मुंबईकर पुनरागमन करण्यात अपयशी ठरले. १९व्या मिनिटाला अनुभवी शब्बीर बापूला मैदानात बदली खेळाडू म्हणून उतरवले, मात्र तोही चमक दाखवू शकला नाही. मध्यंतराला पटनाने १९-११ असे वर्चस्व राखले. ३०व्या मिनिटाला पटनावर लोण चढवून मुंबईकरांनी झुंजार खेळ केला; मात्र अखेरच्या अत्यंत दबावामध्ये मुंबईकरांचे नियंत्रण सुटल्याने त्यांना स्पर्धेत दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
संपूर्ण स्पर्धेत मुंबईच्या प्रत्येक विजयात निर्णयाक कामगिरी केलेला रिशांक देवाडिगा या वेळी अपयशी ठरला. अनुपने एकाकी लढत देताना ८ गुण मिळवले, तर बचावात मोहित चिल्लरने एका सुपर टॅकलसह ६ गुणांची कमाई केली. पटनाकडून रोहित कुमारने आक्रमणात, तर संदीप नरवालने अष्टपैलू खेळ करताना संघाच्या विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले.
विजेतेपद निश्चित झाल्यानंतर पटनाच्या ‘पायरेट्स’चा जल्लोष जबरदस्त होता, तर पराभवाची निराशा मुंबईकरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली.
तत्पूर्वी, चुरशीच्या सामन्यात पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सचे कडवे आव्हान ३१-२७ असे परतावून तिसरे स्थान पटकावले. सुरुवातीला बंगालने पुणेकरांवर दडपण ठेवले; मात्र ११व्या मिनिटापासून सामन्याचे चित्र पालटताना पुण्याने दमदार खेळ केला. पुणेकरांनी बंगालवर २ लोण चढवले. बंगालने ३४व्या मिनिटाला लोण चढवून पुनरागमनाचे प्रयत्न केले. मध्यंतराला १५-८ अशी आघाडी घेतल्यानंतर पुण्याचा खेळ अधिक आक्रमक झाला.
> वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट आक्रमक :
रिशांक देवाडिगा (यू मुंबा)
सर्वोत्कृष्ट बचावपटू :
संदीप नरवाल
(पटना पायरेट्स)
सर्वोत्कृष्ट खेळाडू :
रोहित कुमार
(पटना पायरेट्स)
उदयोन्मुख खेळाडू :
रोहित कुमार
(पटना पायरेट्स)

Web Title: Patna pirate's first 'champion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.