पटणा पायरेट्स सुसाट
By admin | Published: February 17, 2016 02:38 AM2016-02-17T02:38:40+5:302016-02-17T02:38:40+5:30
पटणा पायरेट्सविरुद्ध झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी पूर्ण जोशात मैदानात उतरलेल्या बंगाल वॉरियर्सला चांगल्या सुरुवातीनंतरही पराभवास सामोरे जावे लागले
रोहित नाईक, पटणा
पटणा पायरेट्सविरुद्ध झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी पूर्ण जोशात मैदानात उतरलेल्या बंगाल वॉरियर्सला चांगल्या सुरुवातीनंतरही पराभवास सामोरे जावे लागले. पिछाडीवरून बाजी मारताना पटणाने दबावाखाली आलेल्या बंगालच्या चुकांचा फायदा घेत ३२-२७ अशी बाजी मारताना प्रो-कबड्डीमध्ये सातवा विजय नोंदवला. यासह पटणाने उपांत्य फेरी निश्चित केली आहे.
पाटलीपुत्र स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बंगालने आक्रमक सुरुवात करताना आपला इरादा सष्ट केला. १०व्या मिनिटापर्यंत बंगालने नियंत्रण राखल्यानंतर पटणाने ९-७ असे पुनरागमन केले. प्रदीप नरवालने १५ व्या मिनिटाला निर्णायक सुपर रेड करताना बंगालच्या तब्बल
५ खेळाडूंना बाद करून त्यांच्यावर लोण चढवला. या जोरावर पटणाने
७ गुणांनी मोठी आघाडी घेतली. मध्यंतराला पटणाने १७-११ असे वर्चस्व मिळवले.
दुसऱ्या सत्रात बंगालने जबरदस्त झुंज देत पुनरागमन केले. श्रीकांत जाधवच्या खोलवर चढाया व गिरीश एर्नाकच्या दमदार पकडी या जोरावर बंगालने ३५ व्या मिनिटावर यजमानांवर लोण चढवून २४-२५ अशी पिछाडी कमी केली. या वेळी बंगाल सामना फिरवणार, असे चित्र होते. मात्र माफक चुकांचा फटका बसल्याने अखेर त्यांना सामना गमवावा लागला.
पटणाकडून रोहित कुमारने अष्टपैलू खेळ करून सर्वाधिक ८ गुण मिळवले. प्रदीपने सुपर रेडसह त्याला चांगली साथ दिली, तर हाडी ओश्तोरक व सुनील कुमार यांच्या दमदार पकडी निर्णायक ठरल्या. बंगालकडून श्रीकांतने ७ गुण घेताना एकाकी झुंज दिली, तर गिरीश एर्नाकच्या दमदार पकडी अपयशी ठरल्या.
तत्पूर्वी बलाढ्य जयपूर पिंक पँथर्सने सहज बाजी मारताना तेलुगू टायटन्सला ३५-२६ असा धक्का दिला. मध्यंतराला १९-११ अशी आघाडी घेतल्यानंतर जयपूरने आणखी आक्रमक खेळ केला. जयपूरने तेलुगूवर २ लोण चढवले, तर तेलुगूने एक लोण चढवून पुनरागमनाचे प्रयत्न केले. सोनू नरवालच्या चढाया व कुलदीप सिंग, सी. अरुण यांच्या पकडी जयपूरसाठी निर्णायक ठरल्या. सुकेश हेगडे तेलुगूकडून एकाकी लढला.